भाजप सरकार बहुजनविरोधी, उद्योगपती व सावकारधार्जिणे असून, शेतकऱ्यांना मदत करण्याची त्यांची मानसिकताच नाही. आठ महिन्यांतच दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर आले. राष्ट्रवादीकडे अन्य घोटाळेबाज मंत्र्यांचीही यादी तयार असून ती लवकरच जाहीर करू, असा इशारा देऊन जलयुक्त शिवार योजनेत पाणी किती अडले, हे सांगणे अवघड असले, तरी कोणी किती माया जमवली, हे लवकरच उघड होईल, असा जोरदार आरोप माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला.
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी दुष्काळी मोर्चा काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. माजी मंत्री सुरेश धस, प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी आमदार शंकरराव धोंडगे, उषा दराडे, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, नंदकिशोर मुंदडा, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह जिल्हाभरातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळय़ापासून मोर्चा निघाला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले.
मलिक यांनी केंद्र, राज्य सरकारवर या वेळी जोरदार टीका केली. भाजपचे सरकार मराठा, मुस्लीम, धनगर व दलितविरोधी, परंतु केवळ उद्योगपती, सावकारधार्जिणे आहे, असा आरोप केला. आठ महिन्यांतच सरकारमधील मंत्र्यांचा चिक्की व बनावट पदवी घोटाळा बाहेर आला. अन्य घोटाळेबाज मंत्र्यांची यादी आमच्याकडे तयार होत असून लवकरच ती बाहेर काढू, असा इशाराही दिला. शिक्षणमंत्री तावडे यांचा नापासांसाठीच योजना काढण्याचा सपाटा सुरू होता. पास झालेल्यांसाठी एकही योजना दिली नसल्याने शिक्षणमंत्र्यांना नापासांचा इतका पुळका का? याचा शोध घेतला तेव्हा शिक्षणमंत्रीच बनावट पदवीचे आढळून आल्याचा टोला त्यांनी लगावला.
सुरेश धस यांनी शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री परदेशात सहलीवर गेले. खासदार राजू शेट्टी उसाच्या भावासाठी शरद पवार यांच्या घरासमोर बसले होते, आता ते गप्प का? असा प्रश्न करून पालकमंत्री पंकजा मुंडे केवळ जिल्हाधिकारी कार्यालयातील बठकीसाठीच येतात. त्यांचे आमदारही कोठे दिसत नाहीत. शेतकऱ्यांनी कोणाकडे दाद मागायची? असा सवाल केला. प्रकाश सोळंके यांनीही भाजपची मंडळी केवळ जाहिरातबाज असल्याची टीका केली.
जिल्हाध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी मोर्चानिमित्त पक्षाच्या सर्व नेत्यांची व संघटनांची मोट बांधून राजकीय कसब दाखवून दिले. जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचे भीषण वास्तव मांडत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा मोर्चा आहे, असे सांगून आठ दिवसांत दुष्काळ जाहीर न केल्यास पुन्हा रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला. मोर्चात मराठा महासंघ, समता परिषद, छावा, धनगर आरक्षण समिती, मुस्लीम आरक्षण समिती आदी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकत्रे मोठय़ा संख्येने सहभागी झाले.
मोर्चात सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मोर्चासाठी शहरात बॅनरबाजी करण्यात आली. विधानसभा मतदारसंघाचे फलक लावून वाहनांतून कार्यकत्रे, शेतकरी शहरात दाखल झाले. राष्ट्रवादीच्या घडय़ाळ चिन्हाचे झेंडे, बॅनर घेऊन मोच्रेकऱ्यांसाठी जागोजागी पाण्याची, फळवाटपाची व्यवस्था करण्यात आली. डॉ. क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चात पहिल्यांदाच राष्ट्रवादीअंतर्गत सर्व गटांचे नेते, महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या.