लातूरमधील प्रेम प्रकरणाचा नगरमध्ये थरार
विवाहास नकार देणाऱ्या लातूरमधील अल्पवयीन मुलीचा नगर शहरात कोयत्याने वार करून खून करण्यात आला. खून केल्यानंतर रक्ताळलेला कोयता घेऊन लातूरमधील प्रकाश माणिक कणसे (वय २४) हा तरुण पोलीस ठाण्यात स्वत:हूनच हजर झाला. ही थरारक घटना शुक्रवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान, शहरातील भोसले आखाडा भागात घडली. कोतवाली पोलिसांनी या तरुणाला अटक केली.
मोहिनी तान्हाजी सूर्यवंशी (वय १७, हडगी, निलंगा, लातूर) असे मृत मुलीचे नाव आहे. तिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती व ती सुटीसाठी नगरला मावशीकडे दोन महिन्यांपूर्वी आली होती. प्रकाश हा बीए डीएड झालेला असून पुणे मनपाच्या शहर बससेवेत त्याची चालक म्हणून निवड झाली आहे, परंतु तो अद्याप नोकरीवर रुजू झालेला नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाश कणसे मूळचा लातूर जिल्ह्य़ातील रेणापूरच्या तळणी येथे राहातो. मोहिनीचे आजोळही तळणीचेच. ती लहानपणापासून तिथेच शिकत होती. तेथेच दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. पोलिसांना माहिती देताना प्रकाश याने मोहिनीशी विवाह झाल्याचा दावा केला आहे. मोहिनीच्या घरच्यांना हे संबंध मान्य नव्हते. त्यातूनच त्यांनी तिचा विवाह ठरवण्याच्या हालचाली सुरू केल्या होत्या. त्यासाठीच तिला सुटीच्या निमित्ताने नगरला मावशी जयश्री तीर्थप्रसाद अनंतवाड हिच्याकडे पाठविले होते.
शुक्रवारी सकाळी मावशी व तिचे पती दोघेही नोकरीला गेले होते. घरी मोहिनी एकटीच होती. प्रकाश सकाळी अकरा साडेअकराच्या सुमारास नगरमध्ये आला. तो यापूर्वी अनेकवेळा मोहिनीला भेटला असल्याने ती कोठे राहते हे त्याला माहिती होते. तो थेट तिच्या घरी गेला. तेथे त्यांच्यात काही बोलणेही झाल्याचा व तिने विवाहास नकार दिल्याचा पोलिसांचा संशय आहे. नंतर दोघे घराच्या गच्चीवर गेले. तेथे प्रकाशने मोहिनीच्या डोक्यावर व मानेवर कोयत्याने वार केले. नंतर तो कोयत्यासह कोतवाली पोलीस ठाण्यात साडेबाराच्या सुमारास हजर झाला. तेथे त्याने पोलिसांना आपण मोहिनीला कोयत्याने मारहाण केल्याची माहिती दिली. कोयत्याचे रक्त पाहून पोलिसांनी त्याला मोहिनी जिवंत आहे का, असा प्रश्नही विचारला, त्यावर त्याने ‘सांगता येणार नाही’, असे उत्तर दिले.