सोलापूर व माढय़ातील लोकसभा निवडणुकीतील प्रचाराचा धुरळा संपल्यानंतर उद्या होणा-या मतदानात जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या बाजूने मतदान घडवून आणण्यासाठी व सर्वाना खूश ठेवण्यासाठी प्रमुख तुल्यबळ उमेदवारांची यंत्रणा चांगलीच सक्रिय झाली असून घरोघरी मतदारांना भेटून मतदानाच्या स्लिपा वाटप करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते.
सोलापूर राखीव मतदारसंघात काँग्रेसचे बलाढय़ उमेदवार सुशीलकुमार शिंदे व भाजपचे अ‍ॅड. शरद बनसोडे या दोन तुल्यबळ उमेदवारांसह आम आदमी पार्टीचे ललित बाबर, बसपाचे अ‍ॅड. संजीव सदाफुले यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात आहेत. तर माढा येथे राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिते-पाटील व स्वाभिमानी पक्षाचे सदाशिव खोत आणि अपक्ष प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आम आदमी पार्टीच्या अ‍ॅड. सविता शिंदे, बसपाचे कुंदन बनसोडे आदी २४ उमेदवारांचे भवितव्य उद्या मतदान यंत्रांमध्ये बंद होणार आहे. गेले काही दिवस चाललेला प्रचार संपल्यानंतर प्रमुख तुल्यबळ उमेदवारांनी पडद्यामागून हालचाली चालविल्या असून मतदारांना आपल्या बाजूने आकर्षित करण्यासाठी शेवटपर्यंत क्लुप्त्या केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. प्रतिस्पर्धी उमेदवारांची ताकद कमकुवत करण्यासाठी त्यांच्या अनुयायांसह मित्र पक्षांतील नेते व प्रमुख कार्यकर्त्यांना रात्रीत ‘आपलेसे’ करण्याचा प्रयत्न होत असून त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर होत आहे. यात राजकीय हालचालींना वेग आला असून ‘थैलीशाही’ही महत्त्वाची मानली जात असल्याचे राजकीय जाणकार  सांगतात.
मतदान आपापल्या बाजूने होण्यासाठी मतदान केंद्रांवर मतदान प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेल्या कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लावले जात आहे. त्यासाठी आघाडी व महायुतीसह अन्य प्रमुख उमेदवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. मित्र पक्षांचे कार्यकर्ते
कोणीही नाराज होणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता घेताना तसेच सर्वाना काय हवे काय नको, हे पाहताना उमेदवारांच्या यंत्रणेची अक्षरश: दमछाक होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, प्रचारात रात्रंदिवस काम केल्यानंतर थकवा कमी करण्याची सोय होण्यासाठी कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू असून त्यादृष्टीने ही कार्यकर्ते मंडळी आपापल्या नेत्याकडील ‘थैली’कडे डोळे लावून होती. परंतु निवडणूक प्रशासन यंत्रणेने तीन दिवस संपूर्ण मतदारसंघात परमिट बार, दारूची दुकाने बंद ठेवण्याचे फर्मान काढल्यामुळे काही चलाख मंडळींनी अगोदरच ‘तरतरी’ आणण्यासाठी आपली ‘सोय’ करून ठेवल्याचे सांगण्यात आले.