‘मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायचीय..? मग आमच्याकडे या; आमचा पाठिंबा मिळवा अन् यशस्वी व्हा..!’ असा अनोखा मंत्र मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि वादग्रस्त विधानांसाठी सुपरिचित असलेले ‘साहित्य संघटक’ कौतिकराव ठाले पाटील यांनी नुकताच दिला.
चिपळूण येथे भरणाऱ्या आगामी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचा मसापतर्फे अलीकडेच औरंगाबादेत सत्कार करण्यात आला. त्यावेळी ठाले पाटील यांनी केलेल्या भाषणातील काही वादग्रस्त विधाने आणि त्यांच्या ‘मी’ पणावर मराठवाडय़ाच्या साहित्यिक वर्तुळात आता उलटसुलट चर्चा होत असून, एका अग्रणी समीक्षकाने याबाबत नंतर नापसंतीही व्यक्त केली.
मराठवाडय़ातील ना. धों. महानोर, डॉ. सुधीर रसाळ, प्रा. रा. रं. बोराडे हे ज्येष्ठ साहित्यिक संमेलनाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार असले, तरी या पदासाठीच्या प्रचलित निवडणूक पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव पाहून ते आजवर या भानगडींपासून कटाक्षाने दूर आहेत. संमेलनाध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांनी आपल्या भाषणात महानोर, डॉ. रसाळ आदींनी संमेलनाध्यक्षपदासाठी उभे राहण्याबद्दल ठाले पाटलांसह केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तोच धागा पकडत ठाले पाटील यांनी या ज्येष्ठ मंडळींना निवडणूक रिंगणात उतरा; बाकी आम्ही बघतो, असे सुचविले. संमेलनाध्यक्षपदाच्या दर्जाचे उमेदवार आता मराठवाडय़ातच आहेत, असाही दावा त्यांनी केला. कोत्तापल्ले हे केवळ आमच्या पाठिंब्यामुळे, आमच्या नियोजनामुळे विजयी झाल्याचा सूर ठाले यांनी समारोपाच्या भाषणात काढला. त्याचवेळी त्यांनी कोत्तापल्ले यांची उमेदवारी वृत्तपत्रांनी दुय्यम समजली, असे विधान त्यांनी केले.    
गणित निवडणुकीचे
डॉ. कोत्तापल्ले मोठय़ा फरकाने विजयी झाल्याने, तसेच त्यात मराठवाडय़ाच्या एकगठ्ठा मतांचा मोठा वाटा राहिल्याने वरील सोहळ्यात कौतिकरावांच्या आनंदाला भरते आले होते. त्यामुळे त्यांनी बोलण्याच्या ओघात कोत्तापल्लेंच्या निवडीमागच्या व्यवस्थापनाचे गणितही उपस्थितांसमोर मांडले. अंदाजापेक्षा १०० मते कमीच मिळाली, याबद्दलची खंत व्यक्त करताना त्यांनी मतदारयादीतील एका समाजावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. ‘सुरुवातीला मतदारयादी पाहिली तेव्हा फार ‘भयंकर’ जाणवले. त्यामुळे जोरदार प्रचार करावा लागला’, हे ठाले पाटलांचे वक्तव्य उपस्थितांपैकी अनेकांना धक्कादायक वाटले.