जिल्हय़ातील उदगीर, निलंगा, औसा व अहमदपूर या चार नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी १४ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. पहिल्यांदाच जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. या चारपकी उदगीर, निलंगा, औसा येथे काँग्रेस, तर अहमदपुरात अपक्ष आमदार विनायक पाटील यांची सत्ता आहे. भाजपची अवस्था तोलामोलाचीच असून, शिवसेनेची ताकद अतिशय नगण्य आहे. राष्ट्रवादी औशात काँग्रेसच्या सोबत सत्तेत होती. विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोन माजी मुख्यमंत्री व केंद्रीय गृहमंत्री राहिलेले शिवराज पाटील चाकूरकर यांचा जिल्हय़ावर प्रभाव असल्यामुळे जिल्हय़ातील स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्तास्थाने कायम काँग्रेसच्याच ताब्यात राहिली. त्यामुळे लातूर जिल्हा हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता असल्यामुळे व निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत ते आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. निलंगा नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध काढण्यासाठी त्यांनी विरोधकांसमोर पत्रकार परिषदेतून प्रस्ताव मांडला होता. मात्र, त्याला सर्वच पक्षांनी झिडकारले. निलंग्यात आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाशिवाय उर्वरित छोटय़ा पक्षांची आघाडी अशी पंचरंगी लढत होणार आहे. निलंग्यात सतत काँग्रेस सत्तेत राहिल्यामुळे काँग्रेसच्या नाराजीचा लाभ भाजप किती उठवते व मतविभागणीचा लाभ कोणाला होतो, याकडे मतदारांचे लक्ष आहे. भाजपने शक्ती लावली तर निलंग्यात भाजपला या वेळी सत्ता ताब्यात घेता येऊ शकते. नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी खुले आहे. त्यामुळे इच्छुकांची जुळवाजुळव सुरू आहे. औसा नगरपालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची संयुक्त सत्ता होती. पालिकेचे उपनगराध्यक्ष अफसर शेख यांनी मागील आठवडय़ात आपल्या पदाचा राजीनामा दिला व प्रशासनाच्या विरोधात गरळ ओकली. याचा लाभ निवडणुकीत उठवता येईल, असा त्यांचा होरा होता. मात्र, राष्ट्रवादीवर मतदार नाराज आहेत. एमआयएम या निवडणुकीत उतरणार असली तरी त्यांचेही दोन गट झाले आहेत. याचा फटका काँग्रेस व राष्ट्रवादीलाच बसण्याची शक्यता आहे. औशात भाजपची संघटनात्मक स्थिती चांगली आहे. शिवसेनेने भाजपला साथ दिली तर शिवसेनेचा लाभ होईल. मात्र, सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे फारसे नुकसान होणार नाही, पण शिवसेनेच्या हाती काही लागणार नाही. औशातही भाजपला सत्तेची संधी आहे. नगराध्यक्षपद खुले असल्यामुळे येथे इच्छुकांची संख्याही अधिक आहे.

उदगीर नगरपालिकेत काँग्रेसचे राजेश्वर निटुरे व माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांची सत्ता आहे. पूर्वी बसवराज पाटील नागराळकर यांची त्यांना साथ होती. मात्र, ते राष्ट्रवादीत गेल्यामुळे या वेळी सवतासुभा मांडण्याच्या तयारीत आहेत. भाजपची शक्ती चांगली असली तरी आमदार सुधाकर भालेराव व माजी आमदार गोिवद केंद्रे यांच्या कार्यकर्त्यांतील सुंदोपसुंदीमुळे भाजपच्या हाती काही लागले नव्हते. आता या दोघांनी एकोपा दाखवला तर भाजपची ताकद वाढू शकते. शिवसेनेची शक्ती फारच मर्यादित असल्यामुळे त्यांना फारसा लाभ होणार नाही. काँग्रेस व भाजप अशीच सरळ लढत होण्याची चिन्हे आहेत. उदगीरचे नगराध्यक्षपद खुले असल्यामुळे आठव्यांदा राजेश्वर निटुरे नगराध्यक्ष होणार की त्यांचा अश्वमेध या वेळी अडवला जाणार, हे ठरणार आहे.

अहमदपूर नगरपालिकेत आमदार विनायकराव पाटील यांची सत्ता आहे. ते काँग्रेसमधून बाहेर पडून अपक्ष म्हणून विधानसभेत निवडून आले. काँग्रेसची ताकद अहमदपुरात फारच क्षीण झाली आहे. माजी आमदार बाबासाहेब पाटील हे राष्ट्रवादीच्या वतीने शक्ती पणाला लावणार आहेत, तर भाजपचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके राज्यातील व केंद्रातील सत्तेचा लाभ अहमदपूरवासीयांना पोहोचवण्याचा विश्वास किती देऊ शकतात, यावर भाजपचे यश अवलंबून आहे. अहमदपुरातही भाजपची शक्ती चांगली असली तरी अंतर्गत गटबाजी मोठी आहे. शिवसेनेलाही या निवडणुकीत खाते उघडण्याची संधी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित असल्यामुळे तुल्यबळ महिला उमेदवाराच्या शोधार्थ सर्वच पक्ष गुंतलेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणुकीची ही चाचणी गृहीत धरून सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. गेल्या महिनाभरात मराठा समाजाचे मोच्रे, इतर मागासवर्गीय समाजाच्या प्रतिक्रिया, मुस्लिम समाजाचे मोठे मोच्रे व दलित समाजाचे मोच्रे यामुळे मतदार नेमका कोणाच्या बाजूने झुकणार, याबद्दलही सर्वच राजकीय पक्ष चिंतेत आहेत.