महापालिकेत काँग्रेसशी असलेला घरोबा तोडण्याचे एकतर्फी ‘ऐलान’ करणारे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या गटाला काँग्रेसने केलेल्या छुप्या राजकीय खेळीने सोमवारी चांगलीच चपराक बसली असून स्थायी समितीच्या रिक्त जागांवरील नियुक्तीसाठी बोलविण्यात आलेल्या महासभेत मौलानांच्या नेतृत्वाखालील ‘मालेगाव तिसरी आघाडी’मध्ये फूट पडल्याचे दिसून आले. सभेत दोन्ही गटांनी गटनेतेपदावर दावा करत महापौरांकडे नियुक्त करावयाच्या सदस्यांची बंद पाकिटात नावे दिले तरी पीठासन अधिकारी महापौर ताहेरा शेख यांनी मौलानांना आव्हान देणाऱ्या गटाने दिलेली नावे अधिकृत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता ही निवड वादाच्या भोवऱ्यात अडकणार असा रागरंग निर्माण झाला आहे.
स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या रिक्त होणाऱ्या प्रत्येकी नऊ सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली विशेष महासभा झाली. त्यात विविध पक्षांच्या गटनेत्यांनी आपआपल्या संख्याबळानुसार नियुक्त करावयाच्या सदस्यांची नावे बंद पाकिटात दिली. त्यानुसार स्थायीसाठी काँग्रेस, तिसरा महाज, सेना या पक्षांचे प्रत्यकी दोन तर मालेगाव विकास आघाडी, जनता दल व जनराज्य आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड जाहीर करण्यात आली. तसेच महिला व बालकल्याण समितीसाठी काँग्रेस तीन, तिसरा महाज दोन तर सेना, जनता दल, शहर विकास आघाडी व जनराज्य आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याची निवड जाहीर करण्यात आली.
महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस व तिसऱ्या आघाडीची युती आहे. त्यानुसार महापौरपद काँग्रेस तर, उपमहापौरपद तिसऱ्या आघाडीच्या वाटय़ाला आले होते. तसेच स्थायी समिती व अन्य समित्यांचे उभयपक्षी वाटप करण्यात आले होते. या तहानुसार स्थायी समितीचे सभापतीपद सध्या काँग्रेसच्या वाटय़ाला आले असले तरी काँग्रेसच्या कारभारावर नाखूश होऊन स्थायी समितीच्या रिक्त होणाऱ्या जागांच्या पाश्र्वभूमीवर मौलानांनी पालिकेतील काँग्रेसशी असलेला घरोबा तोडण्याची भाषा काही दिवसांपासून सुरू केली आहे. इतकेच नव्हे तर काँग्रेस वगळता अन्य सर्व पक्षांची मोट बांधून आगामी काळात महापौरपदावरून काँग्रेसला पायउतार करण्याचीदेखील नेपथ्यरचना त्यांनी सुरू केल्याची चर्चा आहे.
मौलानांनी अशा रीतीने काँग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू केले असताना स्थायी तसेच महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांच्या निवडीच्या वेळी अंतर्गत मतभेद उफाळून आल्याने तिसऱ्या आघाडीवरच नामुष्कीची वेळ आली आहे. एप्रिल २०१२ मध्ये पालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर मौलाना यांच्या तिसरा महाजच्या १९ सदस्यांनी मोहंमद सुलतान मोहंमद हारुण यांची गटनेतेपदी निवड करून तशी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली होती. मात्र त्यानंतर तिसरा महाजचे १९, समाजवादी पक्षाचा एक सदस्य तसेच तिघा अपक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली. या गटाने गटनेतेपदी निवड केलेल्या नरेंद्र सोनवणे यांना दोन जून २०१२ रोजी विभागीय आयुक्तांनी मान्यता दिली.
त्यानुसार या गटाचे गटनेते म्हणून इतके दिवस सोनवणे हेच काम बघत आहेत. मात्र सुलतान यांनी आपण १९ सदस्यांच्या तिसरा महाजच्या गटनेतेपदाचा राजीनामाच  दिला नसल्याचे विभागीय आयुक्तांचे पत्र सादर करून स्थायी व महिला समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी आपण दिलेली नावेच अधिकृत समजण्यात यावीत अशी विनंती महापौरांकडे केली. त्यानुसार सोनवणे यांनी दिलेली नावे नाकारत महापौरांनी सुलतान यांचा पक्ष उचलून धरला. दरम्यान महासभेचे एकूणच कामकाज घटनाबाह्य असून त्याविरोधात दाद मागण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. पक्ष विरोधी कारवाई केल्याबद्दल सुलतान यांच्यावरदेखील कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.