संपूर्ण विदर्भात गाजत असलेल्या राज्य सहकारी ग्राहक महासंघाच्या (कंझ्युमर फेडरेशन) सुमारे १०० कोटी रुपयांच्या कोळसा घोटाळ्यात या शिखर संस्थेवर वर्चस्व ठेवून असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच्या नेत्यांनी सुद्धा हात ओले केल्याची माहिती आता समोर येत आहे.
राज्यातील लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांना लागणारा कोळसा पुरवण्याची जबाबदारी लघुउद्योग विकास महामंडळावर आहे. या महामंडळाला कोळसा मंत्रालयाकडून दरवर्षी कोटा मंजूर केला जातो. महामंडळ हे काम कंत्राटदाराच्या माध्यमातून करते. सध्या हे कंत्राट या ग्राहक महासंघाकडे आहे. या महासंघाने कंत्राट मिळाल्यानंतर अभिकर्ता म्हणून नागपूरच्या श्रीरूप एजन्सीची नेमणूक केली. या एजन्सीने महासंघातील अधिकाऱ्यांना हाताशी धरून उद्योगांसाठी खाणींमधून उचललेला कोळसा परस्पर खुल्या बाजारात विकला व त्यातून कोटय़वधी रुपयांचा गैरव्यवहार केला. या आरोपावरून पोलिसांनी सध्या महासंघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह एकूण ९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. महासंघावर वर्चस्व असलेल्या राजकारण्यांच्या सहभागाशिवाय हा घोटाळा होणे शक्यच नाही, असे मत तपास अधिकारी व्यक्त करीत आहेत.
सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या चार शिखर संस्थांपैकी एक अशी या महासंघाची ओळख आहे. या महासंघाच्या संचालक मंडळात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचा भरणा आहे. या महासंघाचे सहव्यवस्थापकीय संचालक खटके, महाव्यवस्थापक खेबुडकर व कोळसा विभागाचे व्यवस्थापक तन्नीरवार यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. महासंघाच्या मुंबई कार्यालयात बसणारे खटके व खेबुडकर यांना पोलिसांनी जबाबासाठी पाचारण केले आहे. मात्र, या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळ मागून घेतला आहे.
घोटाळय़ांचाच इतिहास
मोठमोठी कंत्राटे घेणाऱ्या या महासंघाचा इतिहास सुद्धा घोटाळय़ांनी भरलेला आहे. १९८० मध्ये झालेला सुकडी घोटाळा, दहा वर्षांपूर्वी गाजलेला शालेय पोषण आहार घोटाळा, तांदूळ वितरण घोटाळा, अशी अनेक प्रकरणे या महासंघाच्या नावावर नोंदवली गेली आहेत. राज्यात लघु व मध्यम उद्योगांची संख्या ५ हजारांवर आहे. यापैकी बहुतेक उद्योग बंद आहेत. या बंद उद्योगांच्या नावावर सवलतीच्या दरातला कोळसा उचलून तो बाजारात विकण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होते. यातून सुमारे १०० कोटीचा मलिदा लाटण्यात आला असल्याचा संशय पोलीस व्यक्त करीत आहेत.