केंद्र सरकारच्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूरमध्ये दुचाकी गाडय़ांचा ढकलगाडी मोर्चा काढण्यात आला. टाऊन हॉलच्या मैदानावर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात पक्षाचे निवडक पदाधिकारीच उपस्थित होते. आमदार वैजनाथ शिंदे व जिल्हाध्यक्ष व्यंकट बेंद्रे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांना मोर्चेकऱ्यांनी निवेदन सादर केले.
जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षांनी सकाळी ९.३० वाजता टाऊन हॉलच्या मैदानावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा महागाई विरोधात मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. रविवारी सकाळी निघालेल्या मोर्चात महापौर, उपमहापौर, नगरसेवक, जि.प. सदस्य. पं.स. सदस्य, आमदार व नगराध्यक्ष यांनी पाठ फिरविली. जि.प.चे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष ज्योती पवार, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, व्यंकटेश पुरी यांच्यासह निवडक पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकरांसमोर बोलताना आमदार वैजनाथ शिंदे यांनी महागाईच्या विरोधात भाषणे करून जे सरकार केंद्रात सत्तेवर आले, तेच आता महागाई कमी करणे ही जादूची कांडी नाही, असे सांगते आहे. सरकारचा लबाडपणा उघडकीस आणण्यासाठी हा मोर्चा असल्याचे सांगितले.
भजनाला आठ अन् जेवणाला साठ
चांगल्या कामासाठी लोक उपस्थित राहात नाही, असा सार्वत्रिक अनुभव आहे. काँग्रेसच्या मोर्चातही रविवारी हा अनुभव दिसून आला. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या नावावर ज्यांनी अनेक पदे भोगली, ते आमदार, नगराध्यक्ष, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, नगरसेवक अशा मंडळींनी मोर्चाकडे पाठ फिरविली. ‘भजनाला आठ व जेवणाला साठ’ अशीच आमच्या पक्षाची अवस्था झाली असल्याचे मोर्चातील लोक सांगत होते.