गरीब मुलांच्या शालेय पोषण आहारातील रकमेचा हिस्सा राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेकडे वर्ग करणार असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात ही रक्कम खिशात घालण्याचा उद्योग संयोजकांनी चालवला असल्याचे चित्र वस्त्रनगरीत दिसत आहे. शिक्षण मंडळाच्या सदस्यांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी नगरपालिका, लोकप्रतिनिधी यांच्यापासून ते सहकारी संस्थांकडून बराच निधी गोळा केला असला तरी या निधीतून लोण्याचा गोळा मिळविण्याचा खटाटोप सुरू असून, एका सदस्याने त्याची सुपारी घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. स्पर्धा संयोजन करताना पदरमोड करण्याची परंपरा असलेल्या इचलकरंजीत प्रथमच स्पर्धा संयोजनातून खिसे भरण्याचा उद्योग सुरू झाल्याने येथील पोषक क्रीडावृत्तीला प्रथमच खो बसला आहे.
    उद्योगनगरी असलेल्या इचलकरंजीत सहकार संस्थांचे जाळेही भक्कम आहे. स्वाभाविकच राज्य-राष्ट्रीय पातळीवरील कोणतीही स्पर्धा असली की सहकारी संस्था, उद्योजक यांच्याकडून भरघोस निधी संयोजकांच्या हाती पडत असतो. शुक्रवारी सुरू झालेल्या राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेच्या संयोजनासाठी नगरपालिकेने १० लाख, लोकप्रतिनिधींनी २ लाख तसेच सहकारी संस्थांतून मोठा निधी मिळाला आहे. शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली असल्याने मंडळाचे सदस्य पदरमोड करून स्पर्धेची भव्यता वाढवतील अशी अपेक्षा व्यक्त होणे स्वाभाविक आहे. प्रत्यक्षात मात्र स्पर्धा निधीचे अर्थकारण भलत्याच दिशेने वाहात असून या निधीवर संयोजकच डल्ला मारताना दिसत आहेत.
    नगरपालिका शिक्षण मंडळाच्या ५६ शाळा असून तेथे बारा हजारावर विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जात असला तरी त्याचा ठेका कोणाला द्यायचा याचा निर्णय मंडळाच्या सदस्यांकडे आहे. शालेय पोषण आहाराचे काम बहुतांशी महिला बचतगटाकडे दिले सोपवण्यात आले असून याद्वारे महिलांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्नही आहे. पोषण आहाराची गेल्या काही महिन्यांची बिले अदा करण्याच्या हालचाली सुरू असून, त्यासाठी मंडळाच्या सदस्यांनी एक बठक घेतली. त्यामध्ये बिलाच्या २० टक्के इतकी रक्कम सदस्यांना द्यावी असे खडसावण्यात आले. शालेय खो-खो स्पर्धेच्या संयोजनासाठी ही रक्कम लागणार असल्याचेही सांगण्यात आले.
    प्रत्यक्षात शालेय खो-खो स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूकडून भोजनासाठी रक्कम आकारण्यात आली आहे. त्यासाठी खेळाडूंना पास देण्यात आले आहेत. याचा अर्थ स्पर्धा संयोजनासाठी शालेय पोषण आहाराच्या ठेकेदाराकडून वसूल केली जाणारी २० टक्के रक्कम नेमकी कोणाच्या खिशात गेली आहे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंडळाच्या एका सदस्याने स्पर्धा संयोजनातून प्रत्येकी ५० हजार रुपये मिळवून देतो असे आमिष दाखविले आहे. या प्रकारास क्रीडाप्रेमी असलेल्या एका सदस्याने मी मदानात वावरून कार्यकर्ता म्हणून उदयास आलो असल्याने असा भ्रष्ट पैसा स्वीकारणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. दुसरीकडे निधीचे वितरण कशाप्रकारे करावयाचे, कोणत्या कामाचा ठेका कोणाला द्यावयाचा यावरूनही सदस्यांमध्ये अंतर्गत वाद रंगला आहे. खेळाडूंच्या भोजनाच्या ठिकाणी सदस्यांच्या तसेच शिक्षक, प्रशासनातील  घरचे लोकही ताव मारतानाही दिसत आहे. स्पर्धा संयोजनाला थेट हातभार लावण्याऐवजी सुटाबुटात आणि फेटा बांधून वावरण्यात बहुतेक सदस्य धन्यता मानत आहेत. या गोंधळात क्रीडांगण आकारास आणणारे शिक्षक सत्कारापासून वंचित राहिले आहेत. क्रीडाशिक्षकांचा योग्य सन्मान केला जात नसल्याने अनेक क्रीडाशिक्षकांनी वारणानगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेकडे मोर्चा वळवला आहे. स्थानिक क्रीडा संयोजनात मतभेद निर्माण झाल्याने जयहिंद मंडळाचे पदाधिकारी स्पर्धेपासून अलिप्त आहेत. तर संयोजनात पुढाकार घेणाऱ्या इलेव्हन संघातही मतभेद निर्माण झाले असून त्याची प्रचिती रंगलेल्या पोस्टर वॉरमध्ये दिसत आहे.