राहुरीच्या तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर थकीत पगार व घरकुलांच्या वीजपुरवठय़ासंबंधी ठिय्या आंदोलन करणा-या महिलांना अपशब्द वापरले म्हणून माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर राहुरी पोलिसांनी गुन्हा नोंदविला. दरम्यान, शैलजा धुमाळ व सुभाष पाटील यांनी आपल्या संचालकपदांचे राजीनामे दिले.
राहुरीच्या तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे ४२ महिन्यांचे पगार थकल्याने आंदोलन सुरू आहे. कामगारांनी कुटुंबासह तीन महिन्यांपासून कार्यस्थळावर मुख्य कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. शुक्रवारी अध्यक्ष तनपुरे हे कारखान्यात आले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली. कारखान्याला ७ ते ८ दिवसांत कर्ज मिळणार असून गळीत हंगाम सुरू केला जाणार आहे. दि. १६ पासून कामावर कामगारांनी हजर व्हावे, मी यापूर्वी कोणाचाही खाडा लावणार नाही, असे त्यांनी सांगितले.
कामगारांच्या आंदोलनामुळे कारखान्याची बदनामी होते. वित्तपुरवठा होत नाही, होणारे काम बिघडते असे सांगितले. तसेच आंदोलन थांबविण्यास सुचविले. या वेळी सुरेश थोरात, सुरेश लोखंडे, सादिक सय्यद, सीताराम नालकर, भाऊसाहेब तांबे, सचिन काळे, सुधीर आहेर, अण्णा जगधने, चंद्रकांत दुधाळ, गुलाब शेख, परशराम वाबळे, चंद्रकांत कराळे या कामगारांनी आंदोलन थांबविण्यास नकार दिला. त्यानंतर तनपुरे हे आंदोलनस्थळावरून निघून गेले. येथील दुकानात तनुपरे हे बसलेले असल्याचे कामगारांच्या कुटुंबातील महिलांना समजताच त्यांनी तिकडे धाव घेतली. कामगार वसाहतीचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी तनपुरे यांनी अपशब्द वापरले असा आरोप महिलांनी केला. खुरपायला जाणा-या व गोठय़ात काम करायला जाणा-या महिला मेकअप करून जात नाहीत. तुम्ही वाहिन्यांना मुलाखती देता असे तनपुरे यांनी अपशब्द वापरले, असा आरोप महिलांनी केला. सविता कराळे, सुवर्णा दुधाळ, मंजूषा नालकर, मीनाक्षी तनपुरे, मासूम सय्यद यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सविता कराळे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली.
तनपुरे यांच्याकडून इन्कार
तनपुरे यांनी महिलांना अपशब्द वापरल्याचा त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले, मी कारखान्यावर गेलो असता प्रवेशद्वारासमोर कामगार ठिय्या मांडून बसले होते. आंदोलनासंबंधी मी यापूर्वी काही बोललो नाही. आता आर्थिक तरतूद करून कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घ्या, असे सांगितले. अपशब्द वापरले नाही, पण मला राजकीयदृष्टय़ा बदनाम करण्याचा विरोधकांचा कट आहे. राजकीय जीवनात मी महिलांचा सन्मान केला आहे, कधीही अपमान केला नाही. पण विरोधकांनी माझ्याविरुद्ध षडयंत्र रचले आहे, असे ते म्हणाले.