प्रचंड प्रमाणात पाणी फस्त करणाऱ्या उसाच्या शेतीपेक्षा शेडनेटची शेती अधिक लाभदायक ठरू लागल्यामुळे सोलापूर जिल्हय़ातील उसाच्या पट्टय़ात शेडनेटची शेती उभारी धरू लागली आहे. या शेडनेट शेतीविषयीची उत्सुकता राज्यातील शेतकऱ्यांना लागली असून, सोलापुरात मंगळवेढा भागातील शेडनेटची शेती पाहण्यासाठी अलीकडे राज्यातून सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांनी हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे शेडनेटची शेती उभारण्यापूर्वी मंगळवेढय़ातील शेतकऱ्यांनी यापूर्वी नाशिक जिल्हय़ातील शेडनेट शेती प्रकल्पाची पाहणी केली होती. आता त्याच नाशिक भागातून शेतकरी मंगळवेढय़ाला ही आधुनिक शेती पाहण्यासाठी येत असल्याचे दिसून येते.
जिल्हय़ात शेडनेट शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, आतापर्यंत १२०७ शेतकऱ्यांनी शेडनेट प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले असून, त्यापैकी आतापर्यंत ४३२ प्रकल्पांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. यात सर्वाधिक प्रकल्प मंगळवेढा तालुक्यात आहेत. अधूनमधून दुष्काळी परिस्थिती उद्भवणाऱ्या मंगळवेढय़ात सर्वाधिक ५७८ शेतकऱ्यांनी शेडनेट शेती प्रकल्पासाठी शासनाकडे प्रस्ताव दाखल केले असून, त्यापैकी सर्वाधिक १५४ प्रकल्पांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. जिल्हय़ात तालुकानिहाय शेडनेट शेती प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी दाखल केलेले प्रस्ताव व शासनाकडून मिळालेली तांत्रिक मान्यता याप्रमाणे : कंसातील आकडे तांत्रिक मान्यतेचे आहेत. पंढरपूर-१५९ (६३), मोहोळ-१७४ (६०), उत्तर सोलापूर-८४ (५३), दक्षिण सोलापूर-३७ (३२), अक्कलकोट-३६ (११), सांगोला-३६ (२४), माढा-२३ (१८), बार्शी-३२ (४), माळशिरस-३२ (९) व करमाळा-१६ (४).
शेडनेट शेती प्रकल्प उभारण्यासाठी प्रत्येकी सरासरी १२ लाखांचा खर्च येतो. त्यावर शासनाकडून ५० टक्के अनुदान मिळते. सोलापूर जिल्हय़ात सद्य:स्थितीत तांत्रिक मान्यता मिळालेले शेडनेट शेती प्रकल्प उभारण्यासाठी शासनाकडून सुमारे २७ कोटींपर्यंत अनुदान मिळू शकेल. हा निधी उपलब्ध होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी यांनी नमूद केले. शेडनेट शेतीकडे शेतकरी आकर्षित होण्यासाठी जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे हे प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांच्याच पुढाकारातून मंगळवेढा येथे शेतकऱ्यांची कार्यशाळाही घेण्यात आली. शासनाचा कृषी विभाग व कृषी क्रांती फार्म्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिलेल्या या कार्यशाळेत जिल्हाधिकारी मुंडे यांनी शेडनेट शेतीकडे जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन केले. अवकाळी पाऊस, गारपीट, वादळ यांसारख्या नैसर्गिक संकटातही शेडनेट शेती तग धरून राहते. ढोबळी मिरची, टोमॅटो, काकडी, कलिंगड, पपई, डाळिंब, फुले व अन्य फळेभाज्यांचे उत्पादन कमी अवधीत घेता येते. शेतकऱ्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पाहिले पाहिजे, असा जिल्हाधिकारी मुंडे यांचा आग्रह आहे.
शेडनेट शेती यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करावे लागणार आहे. मेहनत, जिद्द व चिकाटीबरोबर योग्य प्रशिक्षण, बँकांचे अर्थसाहाय्य, बाजारपेठांमध्ये शेतीमालाच्या विक्रीचे नियोजन इत्यादी बाबी महत्त्वाच्या आहेत. याच बळावर मंगळवेढय़ातील सुनील पाटील व इतर शेतकऱ्यांनी कमी पाण्याच्या शेडनेट शेतीत ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले असून, यात एकरी १२५ टनापर्यंत भरघोस उत्पादन घेण्यात आले आहे. सर्वसाधारणत: दरवर्षी जूनमध्ये खरीप हंगामात ढोबळी मिरचीची लागवड होते. परंतु मंगळवेढय़ातील शेतकऱ्यांनी दोन-तीन महिने अगोदरच ढोबळी मिरचीची लागवड केल्यामुळे त्याचा लाभ त्यांना मिळू शकेल. साधारणत: ६० ते ७० टनापर्यंत तरी पिकांचे उत्पादन घेता आले तरी प्रकल्पाचा खर्च पहिल्याच हंगामात भरून निघतो, असा नाईकवाडी यांचा दावा आहे.
शेडनेटची शेती वाढल्यास त्याप्रमाणे शेतीमालाचे निर्यातदार वाढू शकतील. शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट तथा कंपन्या स्थापन केल्यास शेतीमालाच्या विक्रीचे व्यवस्थापन करणे सुलभ जाईल. तसेच शेडनेट प्रकल्प उभारणीचे तंत्रज्ञान तरुणांनी अवगत केल्यास त्यातून उद्योगाला चालना मिळू शकेल. याशिवाय पॅकेजिंग उद्योगही वाढण्यास वाव मिळणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईकवाडी यांनी सांगितले.