डाळिंबाचे आगार म्हणून ओळखल्या जाणा-या आढळा खो-याला आज गारपिटीचा तडाखा बसला. सावरगाव पाट, देवठाण, वीरगाव, पिंपळगाव निपाणी परिसरात दुपारी सुमारे अर्धा तास जोरदार गारांचा वर्षांव झाला. डोंगरगाव, हिवरगाव, गणोरे परिसरातही गारा पडल्या.
मागील आठवडय़ात आढळा खो-यात गारपीट झाली होती. मागील दोन दिवसांपासून वातावरण तसे बदलले होते. मात्र दुपारी अचानक आकाशात ढगांनी दाटी केली आणि अर्धा तास जोरदार गारपीट झाली. बोराएवढय़ा गारांचा खच शेतात पडला. आढळेचा हा पट्टा डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. शेकडो एकरातील डाळिंबाच्या बागा या गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाल्या. डाळिंबाची झाडे पर्णहीन झाली. फुले गळून पडली. लहानलहान फळांचा खच शेतात पसरला. तोडणीच्या अवस्थेतील डाळिंबाची फळे गारपिटीमध्ये फुटली, काही पडली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. परिसरातील द्राक्षबागांचीही अशीच स्थिती झाली. उन्हाळी कांद्याची रोपे गाडली गेली. रब्बी हंगामातील कांद्याच्या पिकाचेही मोठे नुकसान झाले. या वर्षीच्या अपु-या पावसाच्या पाश्र्वभूमीवर मेहनतीने उभी केलेली शेती उद्ध्वस्त होत असल्याचे उघडय़ा डोळय़ांनी शेतक-यांना पाहायला लागले. कोटय़वधी रुपयांचा फटका या गारपिटीमुळे आढळा परिसराला बसला आहे.
अकोले शहर आणि परिसरातही आज तुरळक प्रमाणात गारा पडल्या. पावसाच्या दोन-तीन जोरदार सरीही कोसळल्या. पावसाच्या दरम्यान होणारा विजांचा कडकडाट जणू पावसाळाच लागल्याचे सांगत होता.