दिलीप भोईरांसह रिक्षाचालकांनी विचारला जाब; आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग

‘अरे, या बांधकाम खात्याचे कारायचे काय?.. रस्त्यावर उतरल्याशिवाय उपायच नाय..’ असे फलक लावून अलिबाग-रेवस मार्गावरील आरसीएफ कंपनीच्या समोर शुक्रवारी सहा आसनी विक्रम-मिनीडोअर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनात बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांवर रिक्षाचालकांसह दिलीप भोईरांनाही केलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. या आंदोलनात महिलांनीही मोठी उपस्थिती दर्शविली होती.

अलिबाग-चोंढी-रेवस आणि कनकेश्वर फाटा ते काल्रेिखड रस्त्यावर पडलेल्या अतोनात खड्डय़ांकडे लक्ष वेधण्यासाठी रिक्षा संघटनेने अनेकवार बांधकाम खात्याला पत्रव्यवहार केला. आश्वासनांनीच खड्डे भरणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात खड्डे भरण्याचे काम गांभीर्याने केले नाही. त्यामुळे पंधरा दिवसांपूर्वी रिक्षा संघटनेने बांधकाम खात्याला रस्त्यावर उतरण्याचा शेवटचा इशारा दिला.

दिलेल्या मुदतीत खड्डे भरले गेले नाहीत. शेवटी शुक्रवारी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आरसीएफ कंपनीच्या समोरील रस्त्यावर आंदोलन करण्यात आले. कार्यकारी अभियंता देशपांडे आणि त्यांचे सहकारी आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले.

प्रवाशांना त्रास न देता केले आंदोलन

रिक्षा संघटनेने रस्त्यावरील पडलेल्या खड्डय़ांविरोधात रास्ता रोकोचा इशारा दिला होता. परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी रास्ता रोकोमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि जनतेला होणारा त्रास याची कल्पना दिली. त्यामुळे शुक्रवारी शांततामय वातावरणात आणि कोणतीही वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घेऊन आंदोलन करण्यात आले.

श्रेयासाठी नाही तर जनतेसाठी आंदोलन- दिलीप भोईर

रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दिलीप भोईर यांनी आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन करताना, ‘‘खड्डय़ांविरोधात आंदोलन करण्यात आले आहे, हे श्रेय घेण्यासाठी नाही तर जनतेसाठी आहे,’’ हे स्पष्ट केले. गेली सहा महिने खड्डय़ांमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांसह रिक्षा चालकांनाही आíथक भरुदड सहन करावा लागत आहे. दिवसाच्या कमाईतले अध्रे उत्पन्न डिझेल आणि रिक्षाच्या दुरुस्तीसाठी खर्च करावे लागते. हातात काहीच उरत नाही, मग कुटुंब कसे चालवायचे असा प्रश्न उपस्थित केला. खड्डय़ांमुळे निर्माण झालेल्या समस्या लक्षात घेऊन बांधकाम खात्याने पक्के रस्ते लवकरात लवकर तयार करावेत. नव्याने निविदा काढून अलिबाग-रेवस रस्त्याचे आणि कनकेश्वर फाटा -काल्रेिखड रस्त्याचे नूतनीकरण करावे, असे म्हटले आहे. या वेळी दिलीप भोईर यांनी अलिबागेत या मार्गावरून येणाऱ्या पर्यटकांना होणाऱ्या त्रासाकडेही लक्ष वेधले.

अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती

रिक्षा संघटनेने पोलिसांच्या विनंतीला मान देऊन रास्ता रोको न करता केवळ आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांना कार्यकारी अधिकारी देशपांडे आणि त्यांचे सहकारी सामोरे गेले. संतप्त रिक्षाचालकांनी या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. काम निकृष्ट दर्जाचे होऊ नये, रस्त्याचे नूतनीकरण कधी होणार, खड्डे भरण्याची पद्धत चुकीची असल्याचे निदर्शनास आणून दिले. एकामागोमाग एक होणाऱ्या प्रश्नांच्या माऱ्याने अधिकारी भांबावून गेले. रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सुरुवातीला खड्डे भरले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

रिक्षा चालकांच्या आंदोलनात कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस निरीक्षक वराडे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठय़ा संख्येने बंदोबस्ताला होते. कोणताही अनुचित प्रकार न होता आंदोलन शांततेत पार पडले.

..आणि खड्डे भरण्याचे काम सुरू

अलिबाग-चोंढी-रेवस मार्गावरील जवळपास १२ किमीचा रस्ता खड्डय़ात गेला आहे. गेली सहा महिने या खड्डय़ांचा त्रास जनता सहन करीत आहे. पावसाळा संपला तरी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. पंधरा दिवसांपूर्वी बांधकाम खात्याला रस्त्याबाबत रिक्षा संघटनेने निवेदन दिले होते. गेल्या काही दिवसांपासून खड्डे साफ करण्याचे काम सुरू झाले. अखेर आज खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे रिक्षाचालकांसह प्रवाशांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला.