पोलिसांच्या मदतीने आदिवासींची दिवाळी साजरी

आधीच असलेली गरिबी आणि यंदा निसर्गाने दाखविलेली अवकृपा यामुळे यावर्षीची दिवाळी अंधकारमय जाईल, या चिंतेने ग्रासलेल्या नक्षलग्रस्त गावातील गावकऱ्यांच्या मदतीला पोलिस धावून आले आणि त्यांनी नागरिकांसमवेत दिवाळी साजरी करून त्यांना प्रकाशाचा किरण दाखविला. तसेच नक्षलग्रस्त भागात तणावात काम करणाऱ्या नक्षलविरोधी पथक, सी-६० पथक व पोलिसांनीही यावेळी तणावमुक्त दिवाळी साजरी केली.

चामोर्शी तालुक्यातील घोट पोलिस मदत केंद्रापासून अंदाजे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या लसणपेठ टोला हे गाव आहे. नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल व दुर्गम असलेल्या या गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. गावाला जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. ३५ घरे व १५० लोकवस्तीच्या या गावाला पावसाळय़ात जायचे म्हटजे मोठी कसरत करावी लागते. गावात तीन हातपंप आहेत. परंतु ते ही नादुरूस्त. त्यामुळे गावकऱ्यांना एकाच विहिरीतील पाण्यावर आपली तहान भागवावी लागते. गावात आरोग्यविषयक कुठलीही सुविधा नाही. त्यामुळे पाच-सहा किलोमीटरवरील येडानूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गावकऱ्यांना उपचारासाठी जावे लागते. असे हे गाव घोट पोलिसांना नक्षल अभियानादरम्यान गवसले. पोलिसांनी गावकऱ्यांशी चर्चा केली असता तेथे मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यंदा कोरडय़ा दुष्काळामुळे शेतीची दैनावस्था झाल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे यंदाची दिवाळी अंधारात जाईल, हे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिस उपनिरीक्षक सुनील जायभाये यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे यांना लसणपेठ टोला येथील परिस्थिती सांगितली. लगेच डॉ.कवडे यांनी तेथे दिवाळी साजरी करण्याचा निर्धार केला आणि दिवाळीचा तो दिवस उजाळला. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सागर कवडे, घोटचे पोलिस उपनिरीक्षक सुनील जायभाये, पोलिस उपनिरीक्षक विशाल शिंदे हे आपल्या सहकाऱ्यांसह दिवाळीच्या दिवशी सकाळीच लसणपेठटोला येथे पोहचले. तेथे त्यांनी गावकऱ्यांना मिठाई व फराळ खाऊ घालून त्यांचे तोंड गोड केले. शिवाय लहान मुलांना कपडे वाटप करून फटाके फोडण्याचा आनंदही लुटला आला.

यावेळी त्यांनी गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या लिहून शासनदरबारी पाठपुरावा करण्याचे अभिवचन दिले. पोलिसांच्या या कृत्यामुळे लसणपेठ टोलावासीयांची अंधकारमय दिवाळी प्रकाशकिरणांनी उजळली. देचलीपेठा या गावात पोलिसांनी दिवाळी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तसेच गरीब आदिवासी महिला, पुरूष व गावातील प्रत्येकाला नवीन कपडे, फराळ व इतर साहित्य आणि गोडधोड वितरित करून त्यांची दिवाळी आनंदमय केली. पोलिस उपनिरीक्षक केतन मांजरे, बालाजी मस्के, योगेश गुजर यांनी देचलीपेठा गावात दिवाळी हा सण आनंदाने साजरा व्हावा यासाठी मागील महिन्याभरापासून कामाला सुरुवात केली होती. तसेच एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी, धानोरा, कोरची , मुलचेरा, चामोर्शी, गडचिरोली या नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील तालुक्यातील अतिदुर्गम गावात पोलिसांच्या मदतीने आदिवासींनी दिवाळी साजरी केली. तसेच पोलिस कॅम्प मध्येही दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नक्षलवाद्याशी लढा देतांना पोलिस नेहमीच तणावात असतात. मात्र काल प्रथमच अतिदुर्गम भागातील सर्व पोलिस ठाणे व कॅम्पमध्ये लक्ष्मीपूजन करून दिवाळीचा आनंदोत्सव साजरा केला. यात गावातील प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेत त्यांना दिवाळीचे महत्त्व पटवून देण्यात आाले. जवानांनीही ही दिवाळी आनंदात साजरी केली.

अहेरी येथील प्राणहिता कॅम्प मधील सीआरपीएफ ९ बटालियनमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोलीचे पालकमंत्री अंबरीश आत्राम, चंद्रपूर महानगरपालिकेचे उपमहापौर अनिल फुलझेले व सीआरपीएफचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जवानांना दिवाळी निमित्ताने मिठाईचे वितरण करण्यात आले. तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी जवानांना मिठाई खाऊ घातली. तसेच फटाक्यांची आतषबाजी व इतर सामाजिक उपक्रमही येथे यानिमित्ताने पार पाडण्यात आले. जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा अनुभव विलक्षण आहे या शब्दात अहीर यांनी या दिवाळीचे वर्णन केले तसेच जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

दिवाळी सणाचे राज्यात वेगळेच महत्त्व असते. या महासणाला प्रत्येक घरी गोड-धोड आणि विविध पंच पक्वान बनविले जाते. नवीन कपडे व घरगुती साहित्य इत्यादी खरेदीला प्राधान्य असते. शेतकरी आत्महत्यांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या राजुरा तालुक्यातील सोंडो या गावात या वर्षी शेतकऱ्यांची स्थिती भीषण आहे. अशातच त्यांच्या घरी दिवे कसे लावणार. गोड-धोड आणि पंचपक्वान तर दूरच अशातच घरच्या सदस्यासारखी पुण्यावरून आली शिवप्रभा. शिवप्रभा चॅरिटेबल ट्रस्टने सोंडो गावातील सुमारे २०० परिवाराला दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या घरात आनंदाची ज्योत पेटविली.