शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील समस्यांची दखल घेत साहाय्यक आयुक्त राकेश पाटील यांनी वसतिगृह प्रशासनास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्व समस्या सोडविण्याची ग्वाही त्यांनी दिली.
वसतिगृहातील समस्यांवर ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकल्यानंतर साहाय्यक आयुक्त पाटील यांनी वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. लवकरच एक महिन्याचा निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेशी चर्चा करण्यात आली असून गरजेनुसार टँकर पुरविले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून वरिष्ठ स्तरावर त्याविषयी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. जुन्या वसतिगृहासाठी पूर्णवेळ गृहपाल नेमणुकीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात आला आहे. दोन्ही वेळच्या जेवणाच्या दर्जात सुधारणा करण्याची सूचना देत पाटील यांनी स्वयंपाकगृहातील साहित्याची पाहणी केली. फळे व अंडी देताना काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली.