जमाने के जबीं पर अक्स छोडे हैं निगाहों के
रहेंगे नक्क्ष इनके नाम मिटेंगे शहाओं के..
अजिंठा आणि वेरुळ लेणी घडविणाऱ्या कलाकारांची नावे टिकून राहतील. बांधणारे राजे-रजवाडे येतील आणि जातील, असा अर्थ शायराने नमूद केला आहे. या लेणींची प्रतिकृती बनविणे शक्य आहे काय? महाराष्ट्र पर्यटन विकास आणि महामंडळाने वेरुळ लेणींच्या प्रतिकृती बनविण्याचा निर्णय घेतला. येणाऱ्या पर्यटकांना लेणी समजून सांगता यावी म्हणून कैलास लेणींची प्रतिकृती बनविण्याचे ठरले. तेव्हा मोठय़ा कष्टाने एक नाव पुढे आले, ते म्हणजे सुनील देवरे. जागतिक स्तरावर शिल्पांचे प्रदर्शन मांडणारा औरंगाबादचा हा कलाकार नागेश्वरवाडीत राहतो. वेरुळच्या लेण्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी त्यांना तेथील रचनांचा, त्यावेळच्या  संस्कृतीचा अभ्यास करावा लागला. लेण्यांतील गाभा समजून घेताना कलाकारांनी त्या काळी केलेला विचार आणि इतिहास याचेही अध्ययन करावे लागले आणि तब्बल दीड वर्षांनंतर कैलास लेणींची प्रतिकृती फायबरमध्ये तयार होऊ शकली. वेरुळच्या व्हिजिटर सेंटरमध्ये ही प्रतिकृती आता पर्यटकांना पाहायला मिळू शकते. ही प्रतिकृती आधी अभ्यासायची आणि मग मुख्य लेणीचा भाग पाहावा, असे पर्यटन विभागाला अपेक्षित आहे.
वेरुळमध्ये ३८ कोटी ६२ लाख खर्चून वेरुळ व्हिजिटर सेंटर उभारण्यात आले. दोन लाख चौरस मीटर जागेवर उभारलेल्या या व्हिजिटर सेंटरमध्ये प्रदर्शनीय एक दशांश भागात कैलाश लेणींची प्रतिकृती उभारली आहे. छोटय़ा स्वरुपातील कैलास लेणी उभारणाऱ्या देवरे यांचे हात लहानपणापासून नावीन्यासाठी धडपडायचे. त्यांचे वडील पुरातत्त्व विभागात नोकरीस होते. त्यामुळे लहानपणापासून देवरे या ऐतिहासिक वास्तूंमध्ये आवर्जून जात. सन १९९४मध्ये ते जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून पदवी घेऊन बाहेर पडले, तेव्हा आपल्याकडे शिल्पकला महापुरुषांचे पुतळे बनविण्याच्या पलीकडे पोहोचली नव्हती. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे बनविण्याचे काम त्यांनी हाती घेण्यास सुरुवात केली. ४५पेक्षा अधिक पुतळे त्यांनी आतापर्यंत बनविले. देवरे यांची काही प्रदर्शने लंडन, जपान व इटली येथेही झाली आहेत.
अण्णा भाऊ साठेंच्या जीवनावर वाटेगाव येथे ‘अण्णा भाऊ स्मृतिसृष्टी’ उभी केली जात आहे. तसेच सावित्रीबाई फुले यांच्याही जीवनावरची स्मृतिसृष्टी बनविली. पण वेरुळची प्रतिकृती बनविण्यासाठी बरेच कष्ट घ्यावे लागले. त्या वेळी कलाकारांनी केलेला विचार लक्षात ठेवणे आवश्यक होते. काही कलाकृतींमध्ये केसांच्या रचना अशा पद्धतीने होत्या की, त्याची फॅशन ठरवूनसुद्धा या काळात होऊ शकत नाही. कर्णफुले, हातांच्या रचना, वेगवेगळ्या मुद्रा याचा अभ्यास केल्यानंतर कैलास लेणीची प्रतिकृती तयार झाली. प्रत्येक भागाचे वेगळे छायाचित्र घ्यावे लागले. त्यानंतर तो भाग बनवायचा कसा, हे ठरवून काम करावे लागले. देवरे म्हणतात, त्या काळी धम्मासाठी काम होत असे. कामावर निष्ठा असे. त्यातील बारकाव्यांचा अभ्यास करताना त्याविषयी श्रद्धा नि आदर असेल तरच ते शिल्प चांगले होते. गौतम बुद्ध किती कळले, असा प्रश्न कलाकाराला विचारला तर त्याचे उत्तर एका शिल्पातून आम्हीही दाखवतो. बुद्धाचा अर्धा चेहरा झाकलेला आणि अर्धाच चेहरा दिसतो. असे शिल्प बरेच काही सांगून जाते. वेरुळमधील लेण्यांमधील दशावतार, त्याच्या जातक कथा निश्चितच हुरूप आणणाऱ्या आहेत. त्या कलाकारांएवढे नाही, पण त्यांची प्रतिकृती करण्याचा मान मिळाला, याचा अभिमान आहे.