भूताळीण असल्याचे सांगत महिलेस मारहाण करणाऱ्या कळवण तालुक्यातील भोंदूबाबा विरोधात जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात सुरगाणा तालुक्यातील नवापूर येथील धवळीबाई गावित व माधव गायकवाड यांनी कळवण पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मंगलाबाई गावित ही धवळीबाई यांची जाऊ अनेक दिवसांपासून आजारी आहे. वैद्यकीय उपचारांनीही त्या ठीक झाल्या नसताना कळवण तालुक्यातील गणोरे येथील नामदेव शामा पवार या भगताविषयी धवळीबाई यांना माहिती मिळाली. पवार हा जादूटोणा करून रुग्णांना बरे करतो, असे त्यांना सांगण्यात आल्याने त्या २५ जून रोजी मंगलाबाई यांना घेऊन पवार याच्या गणोरे येथील निवासस्थानी दुपारी घेऊन गेल्या. त्यांच्या समवेत माधव गायकवाड हे उपस्थित होते. धवळीबाईने पवार यास रुग्णाची सर्व माहिती सांगितल्यावर पवारने धवळीबाईवरच भूताळीण असल्याचा आरोप करून या बाईमुळेच मंगलाबाई आजारी पडल्याचे सांगितले. या बाईचे हातपाय तोडून लिंबू फिरविल्यास रुग्ण लगेच बरा होईल, असेही त्याने नमूद केले. त्यावर धवळीबाईने आम्ही तुमच्याकडे रुग्णाला बरे करण्यासाठी आणले आणि तुम्ही आमच्यावरच खोटे आरोप करत असल्याचे सांगताच पवारने तिला आणि तिच्यासोबत आलेले नातलग गायकवाड यांना शिवीगाळ करीत दंडुक्याने मारहाण केली. ठार मारण्याची धमकीही दिली. तुम्ही पोलिसात तक्रार दिल्यास पोलीस आपले काहीही करू शकणार नाहीत, असेही त्याने सांगितले. या भोंदूबाबास अटक करण्याची मागणी धवळीबाई व गायकवाड यांनी तक्रारीत केली होती. या तक्रारीवरून भोंदूबाबा नामदेव पवार यांसह त्याचा मुलगा व दोन पत्नींविरोधात कळवण पोलीस ठाण्यात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना गुरुवारी
अटक केली.