मंत्री कांबळेंना शेतक ऱ्याचा प्रश्न

‘मी अडचणीत आहे, भाचीचे लग्न तोंडावर आहे, तुरीचे पैसे कधी मिळणार’, असा थेट प्रश्न सेनगाव तालुक्यातील ताकसोड येथील सावके या शेतकऱ्याने पालकमंत्री दिलीप कांबळे यांना विचारला आणि सरकारी रक्कम कधी मिळेल, हे न सांगता कांबळे यांनी भाजपच्या खात्यातून एक लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले. मात्र बाजार समितीला भेट देण्यासाठी आलेल्या कांबळे यांनी इतर शेतकऱ्यांच्या तक्रारी न ऐकताच काढता पाय घेतला. त्यामुळे अनेक शेतक ऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला.

पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी शुक्रवारी िहगोली बाजार समितीच्या संत नामदेव मार्केटयार्डाला भेट दिली. बाजार समितीच्या मार्केटयार्डातील आतापर्यंत ४० हजार क्विटल तूर खरेदी झाली. २६ मे पर्यंत तूर विक्रीसाठी सुमारे १५ हजार  शेतकऱ्यांनी नोंदणी केली. आजमितीला मार्केटयार्डात पाच ते सहा हजार क्विटल तूर वजनकाटय़ाविना पडून आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून १५ ते २० हजार क्विटल तूर खरेदीसाठी येईल, नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाणार असल्याचे सुरूवातीलाच बाजार समितीचे सभापती रामेश्वर शिंदे यांनी सांगितले.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बोलताना सभापती शिंदे यांनी मात्र शासनाचे तूर खरेदीचे नियोजन नसल्यामुळे नाफेडमार्फत ४० हजार क्विटल तूर खरेदी झाली असली तरी तूर खरेदीच्या प्रतीक्षेत न राहता नवा मोंढा येथे खाजगी व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांनी प्रतिदिन १ हजार क्विटलच्यावर म्हणजेच आतापर्यंत ३० ते ४० हजार क्विटल तुरीची विक्री केल्याचे सांगितले. शेतकऱ्याला ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विटल भाव मिळाला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करून त्या शेतकऱ्यांना १ हजार रुपये प्रतिक्विटल अनुदान शासनाने जाहीर करावे, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे लावून धरली होती.

मार्केटयार्डात पालकमंत्र्यांसोबत आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी खासदार शिवाजीराव माने, सुभाषराव वानखेडे, अॅड. के. के. शिंदे आदींची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष मार्केटयार्डाला भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी देवकरवाडी येथील शेतकरी प्रल्हाद रामजी खेडेकर यांनी १९ एप्रिल रोजी तूर विक्रीसाठी आणली. मात्र, अद्याप त्यांच्या मालाची खरेदी झाली नाही. तूर विक्रीच्या यादीत आठ दिवसांपूर्वी त्यांचा ८३वा नंबर होता. त्यांच्यानंतर आलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या तुरीची विक्री झाली. हा शेतकरी मुक्कामीच होता.

पालकमंत्र्यांसमोर संताप

पालकमंत्री सभापतींच्या कक्षात बसलेले असताना बाहेर अनेक शेतकऱ्यांचा जमाव जमला होता. त्यामध्ये तुकारामअप्पा कापसे (रा. लासिना), विठ्ठल रामचंद्र धाकतोडे (रा. सुकळी बु.), पांडुरंग राजाराम शिंदे (रा. केसापूर), शेख निजाम शेख अहेमद (रा. शिवणी)सह इतर जमलेल्या शेतकऱ्यांनी आमच्या तूर विक्रीसाठीच्या नोंदी घेणार किंवा नाही नसता आमच्याकडील याद्या पालकमंत्र्यांच्या समोरच फाडून टाकतो, असे वैतागून हे शेतकरी पालकमंत्र्यासमोर बोलत असताना सभापती शिंदे व सचिव जब्बार पटेल यांनी त्या शेतकऱ्यांना नोंदणी करून घेण्यासाठी एका कर्मचाऱ्यासोबत दुसऱ्या कक्षात पाठविले.