मान्सून लवकर सक्रिय होणार असल्यामुळे शेतकरी आनंदी आहे. मात्र, या आनंदावर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे चिंतेचे ढग निर्माण झाल्याचे दिसते. उस्मानाबादमधील जवळपास ८ हजार १११ शेतकऱ्यांच्या खात्यातून सक्तीने कर्ज वसुली करण्यात आली आहे. पीक विमा योजनेअंतर्गत जमा झालेल्या रक्कमेतून ५० टक्के रक्कम कर्जापोटी कपात करण्यात आली. कर्ज वसुली करण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या पीक विमाच्या लाभांशातून ५० टक्के रक्कम कपात करण्याचे आदेश दिले होते. या सरकारी धोरणाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. परिणामी, पेरणीसाठी भांडवल नसल्यामुळे ८ हजार १११ शेतकऱ्यांना पेरणी कशी करावी? या चिंतेने ग्रासले आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या चार वर्षात कोणतेही पीक हाती लागतं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून पीक विमा भरला जातो. विम्याच्या माध्यमातून हातात आलेल्या पैशातून अनेक काम केली जातात. मात्र, यावर्षी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा बँकांना पीक विम्यातून ५० टक्के रक्कम कर्जापोटी कपात करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर उस्मानाबाद जिल्हा बँकेने ८ हजार १११ शेतकऱ्यांच्या खात्यामधून ५ कोटी १२ लाख रुपयांची रक्कम कपात केली. दुष्काळाने शेतकरी हैराण असल्यामुळे शासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध झाला. सर्व स्थरातून होत असलेला विरोध लक्षात घेता या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. मात्र, तोपर्यंत एकट्या उस्मानाबाद जिल्हा बँकेकडून ८ हजार १११ शेतकरी कुटुंबाची रक्कम कपात करण्यात आली होती.