डॉ. प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला

शेतक ऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काँग्रेसच्या काळातही काही केले गेले नाही आणि आता भाजपच्या काळातही काही उपाय राबवले जाताना दिसत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी ‘सुसाईड बाँब’ बनावे, आत्महत्या करताना सोबत राजकीय पक्षाच्या नेत्याला घेऊन मरावे, असे सल्ला भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिला.

कॉ. भास्करराव जाधव स्मृति प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आंबेडकर शनिवारी नगरमध्ये आले होते. लालनिशाण पक्षाचे भीमराव बनसोड, निलिमा बंडेलू आदी या वेळी उपस्थित होते. काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. आत्महत्या टाळण्यासाठी, शेतीला हमी भाव हवा असेल तर शेतकऱ्यांनी आमच्या हाती सत्ता देऊन पहावी, असे सांगताना आंबेडकर यांनी शेतकऱ्यांना  खळबळजनक पर्याय सांगितला. राज्यातील भाजप सरकार स्वत:ची निष्क्रियता लपवण्यासाठीच पूर्वीच्या मंत्र्यांना ‘टार्गेट’ करीत आहे, अर्धी काँग्रेस चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. आता दोन्ही काँग्रेसमध्ये एवढीही ताकद राहिली नाही की ते याविरुद्ध आवाज उठवू शकतील. त्यांच्यातील बळ संपलेले आहे. सध्याच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध साधा अर्जही लिहिण्याची ताकद त्यांच्यात राहिलेली नाही. शरद पवार उगाच गप्प  बसलेले नाहीत, त्यांनाही संभाव्य कारवाईची भीती  वाटत असावी, असा टोला लगावून आंबेडकर म्हणाले की, अशा परिस्थितीत केवळ डावे व आंबेडकरवादीच आवाज उठवू शकतात, आम्ही फकीर आहोत. शेतकऱ्यांना आगतीक बनवून आत्महत्या करण्यास भाग पाडण्याचे सरकारचे धोरण आहे. जलयुक्त शिवार योजनेपेक्षा शेतीतच पाणी जिरवण्याचे धोरण स्वीकारले पाहिजे, जलयुक्तचा परिणाम दिसायला किमान ४ वर्षे लागतील व त्यासाठी पाऊसही पडायला हवा. सरकारने राज्यातील पाणी साठे ताब्यात घेऊन त्याचे नियोजन करावे, तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत. सरकार दुष्काळाच्या विषयावर गंभीर दिसत नाही, अशीही टीका त्यांनी केली.