स्वत:च्या पाच वर्षीय मुलीस पित्याने ३० हजार रुपयांत विकल्याचा धक्कादायक प्रकार भडगाव येथे उघड झाला आहे. या प्रकरणी पित्यासह पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलींची खरेदी-विक्री करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.
शशिकांत केदाळे पाच दिवसांपूर्वी आपल्या पाच वर्षीय मुलीस घेऊन घराबाहेर पडले. संध्याकाळपर्यंत ते परत आलेच नाहीत. यामुळे मुलीची आई सुरेखा केंदाळे यांनी सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, ती सापडली नाही. दोन दिवसांनंतर पती घरी आल्यावर आईने मुलीबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने आपण मुलीस ३० हजार रुपयात विकल्याचे सांगितले. त्यामुळे हादरलेल्या सुरेखा यांनी पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पतीचे शीतल बागूल (उल्हासनगर) या महिलेशी प्रेमसंबंध असल्याची माहिती पत्नीने दिली. पोलिसांनी शीतलला ताब्यात घेताच तिने यात दलाल ताराबाई, लताबाई यांचा समावेश असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी शशिकांत केंदाळे, शीतल बागूल, लताबाई (मुंबई), ताराबाई (चेंबूर), सनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासात हा विक्रीचा धक्कादायक प्रकार उघड झाला. ताराबाई व लताबाईने मुंबईत राहणाऱ्या सनी नामक व्यक्तीशी बालिकेचे वडील शशिकांत यांची गाठ घालून दिली. ३० हजार रुपयांत व्यवहार पार पडल्यावर सनीने १५ हजार रुपये आगाऊ रक्कम दिली. बालिकेस घेऊन बांद्रा स्थानकावरून ते जयपूरला रवाना झाले. जयपूरला पोहोचल्यावर उर्वरित १५ हजार रुपये मुलीच्या पित्यास दिले, अशी माहिती पुढे आली आहे. पाचही संशयितांना अटक करून पोलिसांनी विक्री झालेल्या मुलीचीही सुटका केली आहे.