उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. मात्र, वाऱ्याच्या वेगामुळे आगीचे लोळ उसळून कारखान्याच्या दिशेने जात असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात मोठे अडथळे निर्माण होत होते.
वाऱ्याबरोबर कारखान्याच्या बॉयलर व मुख्य इमारतीकडे आगीचा भडका वेगाने फोफावला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उस्मानाबादसह सोलापूर व लातूर जिल्ह्यांतील अग्निशमन दलाच्या गाडय़ा प्रयत्न करीत होत्या. दुपारी तीनच्या सुमारास कारखान्यातील बगॅसने पेट घेतला. बगॅस मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे आगीचा विळखा वाऱ्याच्या वेगाबरोबर वाढत गेला. परिणामी, पूर्ण बगॅस आणि कारखान्याच्या बाजूच्या स्टोअर व मुख्य इमारतीलाही धोका निर्माण झाला.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आगीवर नियंत्रणासाठी तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या, मात्र  उपलब्ध अग्निशमन दलाच्या गाडय़ा व आगीचे स्वरूप यामुळे आग नियंत्रणात आणण्यास कमालीची धावपळ झाली. अतिरिक्त जिल्हाधिकारी जे. टी. पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी तांबे यांनी आदेश दिल्यानंतर उस्मानाबाद, तुळजापूर, भूम, कळंब, उमरगा येथील अग्निशमन दलाच्या गाडय़ा दाखल झाल्या. लातूर, औसा, सोलापूर, बार्शी येथील अग्निशमन गाडय़ांनाही पाचारण करण्यात आले.
आगीचा भडका वाढत असल्यामुळे कारखान्याची मुख्य इमारत, बॉयलर व गाळप यंत्रणेलाही मोठा धक्का लागण्याची शक्यता निर्माण झाली. कारखान्यातील बलगाडी वाहनतळालाही आगीची झळ लागण्यास सुरुवात झाली. साखरेचे गोदाम वाचविण्यात प्रशासनाला यश आले. आग आटोक्यात आणण्यासाठी कारखान्यातील कर्मचारी, तसेच लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यांतून दाखल अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. कारखान्याचे अध्यक्ष अरिवद गोरे व उस्मानाबादचे तहसीलदार सुभाष काकडे यांनीही आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले.