गाळ काढण्यासाठी विहिरीत उतरलेल्या पाच मजुरांचा डिझेल इंजिनच्या धुरामुळे गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी वडकी येथे दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत दोन जण अत्यवस्थ असून त्यांना उपचारासाठी सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे एका विहिरीतील गाळ काढण्यासाठी सात मजूर विहिरीत उतरले होते. आधी विहिरीतील पाणी उपसण्यासाठी विहिरीत डिझेल इंजिन लावण्यात आले होते. इंजिन सुरू केल्यानंतर इंजिनचा प्रचंड धूर विहिरीतच जमा झाल्यामुळे विहिरीत उतरलेल्या मजुरांना प्राणवायू मिळाला नाही. धुरामुळे गुदमरून पाच जणांचा विहिरीत मृत्यू झाला, तर दोघे अत्यवस्थ झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये विजय पुंजाराम नंदूरकर, गणेश राजू नंदूरकर, रूपेश कवडू कुळमेथे, शंकर रमेश जोगी व आशीष तुकाराम मडावी या पाच जणांचा समावेश आहे, तर राजू बावणे आणि प्रफुल्ल हिवरे हे दोघे अत्यवस्थ असून त्यांना सेवाग्राम येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
मंगळवारी मृतदेह बाहेर काढून ते उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या घटनेने सारे वडकी गाव शोकाकुल झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वीही यवतमाळ जिल्ह्य़ात दोन घटनांमध्ये पाच जणांचे जीव गेले होते.