मेळघाटातील वाघाच्या शिकार प्रकरणाचा तपास करत असताना पंच म्हणून एका पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला सोबत नेणे आता सीबीआयच्याच अंगलट आले आहे. वाघाच्या शिकारीचा शोध सुरू असलेल्या जंगलात एका वाघिणीने बछडय़ांना दिलेला जन्माची वाच्यता कुठेही करू नये, अशी सक्त ताकीद सीबीआयने संपूर्ण चमूला दिली होती. मात्र, त्यानंतरही तपासयंत्रणेचा घटक असलेल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने छायाचित्रासह ती माहिती जगजाहीर करून चौकशीत अडथळे निर्माण केले. तरीही संबंधित वनखात्याने या प्रकरणी बाळगलेले मौन वाघांच्या शिकारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारीचे प्रकरण राज्यच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. वनखाते या प्रकरणाची चौकशी करण्यास असमर्थ ठरल्यानंतर हे प्रकरण सीबीआयकडे चौकशीसाठी सोपवण्यात आले. त्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या चौकशीच्या जाळ्यात अनेक शिकारी अडकले. वाघांच्या शिकारीचा आकडा २०-२२ नव्हे, तर दुपटीच्या घरात असल्याचा त्यांचा कयास आहे. अशाच एका प्रकरणात त्यांनी मध्यप्रदेशातुन कुट्ट नावाच्या शिकाऱ्याला अटक केली. त्याच्या कबुलीनंतर सीबीआयचे अधिकारी त्याला घेऊन भंडारा जिल्ह्य़ातील जंगलात गेले. त्यावेळी सोबत असलेली वनखात्याची ‘स्टेफी’ नावाची कुत्री वारूळाजवळ थबकली. ‘स्टेफी’ का थांबली म्हणून अधिकारी तेथे गेले तेव्हा त्यांना जंगलातील वारूळात वाघिणीचे बछडे दिसले. त्यामुळे तपास अध्र्यावर सोडून आणि तातडीने छायाचित्रे व चित्रीकरण करून सीबीआय व त्यांची चमू परतली. त्याच वेळी सीबीआयने सर्वाना वाघीण आणि तिच्या बछडय़ांची वाच्यता कुठेही करू नये, अशी सक्त ताकीद दिली होती. १५ दिवसानंतर पुन्हा गेलेल्या सीबीआयच्या चमूत पंच म्हणून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गुणवंत भडके यांना सोबत घेण्यात आले होते. सीबीआयच्या ताकिदीनंतरही डॉ. भडके व काही स्वयंसेवी त्या ठिकाणी गेले. त्यांनी छायाचित्रे व चित्रीकरणाचा प्रयत्न करताच जवळच असलेल्या वाघिणीने डॉ. भडके व त्यांच्या सहकाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रसंगावधान राखल्याने त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यातून धडा न घेता वाघिणीच्या वारूळातील बछडय़ांचे छायाचित्र व माहिती प्रसिद्ध करण्याचा धडाका त्यांनी लावला. ‘स्टेफी’ने वाघीण व तिच्या बछडय़ांचा शोध घेतल्यानंतरही त्याचे श्रेय लाटण्याचा प्रकार सीबीआयलासुद्धा चक्रावून टाकणारा ठरला.

* वाघीण आणि तिच्या बछडय़ांचा शोध सीबीआयने नव्हे, तर आम्ही लावला. आम्हीच त्याचे छायाचित्र व चित्रीकरण सीबीआयला सोपवल्याचा दावा डॉ. गुणवंत भडके यांनी केला. वारूळाचा मला छंद आहे आणि अशाच संशोधनादरम्यान मला हे दिसून आले. सीबीआय तपासादरम्यान अशी माहिती उघडकीस आणणे शिकाऱ्यांना प्रवृत्त करणारे नाही का, असे विचारले असता शिकारी कधीच बछडे असणाऱ्या वाघिणीला मारत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
 
* वाघांच्या शिकारीची चौकशी सुरू असताना सार्वजनिकदृष्टय़ा अशी माहिती बाहेर येणे वाघांच्या अस्तित्वासाठी आणखी धोकादायक आहे. याआधीही २००९-२०१० या वर्षांत पिल्ले असलेल्या वाघिणीच्या शिकारीच्या एक-दोन नव्हे, तर अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात वाघीण आणि तिच्या बछडय़ांना तर धोका आहेच, पण त्याशिवाय बछडय़ांच्या संरक्षणार्थ वाघीण माणसांवरही हल्ला करण्याची शक्यता असते आणि भंडाऱ्याच्या या प्रकरणात डॉ. भडके व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे, असे प्रतिपादन मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी केले.