पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील तिहेरी दलित हत्याकांडप्रकरणी आणखी चौघांची नार्को व अन्य न्यायवैद्यक चाचण्या करण्याची पोलिसांची मागणी न्यायालयाने फेटाळली. ही परवानगी मागणारा पोलिसांचा अर्ज पाथर्डी येथील न्यायालयाने गुरुवारी फेटाळला. या निर्णयाने पोलिसांना धक्का बसला आहे.
न्यायदंडाधिकारी व्ही. एफ. चौघुले यांनी पोलिसांना ही परवानगी नाकारली. गेल्या सव्वा महिन्यातही पोलीस या हत्याकांडाचा तपास लावू शकलेले नाहीत. याबाबत यापूर्वी सहा संशयितांची नार्को व अन्य न्यायवैद्यक चाचण्या पोलिसांनी केल्या आहेत. त्याच आधारावर मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पाथर्डी न्यायालयात आणखी चौघांच्या अशाच चाचण्यांसाठी परवानगी मागितली होती. मागच्याच आठवडय़ात हा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्याची सुनावणी गुरुवारी झाली.
संबंधित चौघेही गुरुवारी सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर होते. या चौघांनी वकिलामार्फत या चाचण्यांना विरोध केला. पोलिसांची ही मागणी वस्तुस्थितीला धरून नाही. पोलिसांनी चौघांची याआधी अनेक वेळा चौकशी केली आहे. चौघांनी तपासात पोलिसांना मदतही केली आहे. हे चौघे आरोपी आहेत की साक्षीदार, याचा या नोटिशीतून बोध होत नाही. हे सर्व दलित कुटुंबातील असून पोलिसांनी या प्रकरणात दलित अत्याचार विरोधी (अ‍ॅट्रॉसिटी) कलमे लावली आहेत, मग यांच्या चाचण्या कशासाठी, असा सवाल करून हा या चौघांचा छळवाद आहे, असा युक्तिवाद या चौघांच्या वकिलांनी केला. शिवाय घटनेतील याबाबतच्या कलमानुसार ज्याच्या चाचण्या घ्यायच्या आहेत, त्यांची त्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे, असे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले. या चौघांच्या वतीने राणा खेडकर, नितीन वायभासे व सुभाष लांडे या वकिलांनी काम पाहिले.
सरकारच्या वतीने सरकारी वकील शिवाजी दराडे यांनी हे प्रकरण संवेदनशील असल्याचे स्पष्ट केले. या चौघांच्या चाचण्यांमधून पोलिसांच्या तपासाला मदतच होणार आहे. त्यात कोणाच्याही व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा येणार नाही. शिवाय हे आरोपी नव्हेतर साक्षीदार आहेत, त्यांच्या चाचण्यांमधून या घटनेतील सत्य बाहेर येण्यास मदत होईल, असा प्रतिवाद त्यांनी केला. सुनावणीअंती न्यायालयाने पोलिसांचा अर्ज फेटाळून लावत ही परवानगी नाकारली. त्यामुळे आता पुन्हा तपासाचा प्रश्न उभा राहणार आहे.