सध्याची सरकारी धोरणे ही केवळ शहरी भाग आणि उद्योगपतींना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील जनतेचा कोणताही विचार करण्यात आला नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. शरद पवार यांच्या मराठवाड्यातील तीन दिवसीय दुष्काळ दौऱ्याला आजपासून औरंगाबाद येथून सुरूवात झाली. यावेळी औरंगाबादमधील काही भागांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारकडे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची मागणी केली. अन्यथा वेळ आल्यास आम्ही सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरू अशा इशाराही यावेळी पवारांनी दिला. मात्र, हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने व्हावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.