शिवसेनेने आपले मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून  पाकिस्तानात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात घोटकी परिसरात बुधवारी दोन हिंदू तरुणांना दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार करण्यात आले होते.  पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू समाजावर निर्घृण हल्ले सुरू आहेत व हे हल्ले दिवसेंदिवस वाढतच असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे. अशा परिस्थितीत  हिंदूचा आक्रोशाकडे कोण लक्ष देणार असा सवाल शिवसेनेने ‘हिंदूचा अक्रोश’ या मथळ्याखालील अग्रलेखातून केला आहे. पाकिस्तानात हिंदू मंदिरे पाडली जात आहेत. तेथील हिंदूंच्या धार्मिक सण-उत्सवांवर दहशतीचे सावट आहे. मात्र, आपल्याकडील काही मंडळी देशाच्या अब्रूचे युनोत ‘धिंडवडे’ काढतात असा उल्लेख करुन शिवसेनेने  आझम खान यांच्यावर निशाणा साधला. अल्पसंख्याकावरील अत्य़ाचारावर बोलणारे आझम खान कश्मीरातील हिंदूंच्या अत्याचाराबाबत चकार शब्द उच्चारायला तयार नाहीत. याला काय म्हणणार? असा टोलाही शिवसेनेने लगावला. आपल्याकडे  राज्यात व केंद्रातील मंत्रीपदे मुसलमानांच्या चरणी अर्पण करून आपले निधर्मीपण सिद्ध करून दाखविण्याची जणू चढाओढच लागलेली असते. या चढाओढीत कधीकाळी हिंदुत्वावरून रान उठविणारे आता सामील झाले आहेत. किमान त्यांनी पाकिस्तानात रोज मरणार्‍या हिंदूंचा आक्रोश जरा ऐकण्याची तसदी घ्यावी, असा सल्ला शिवसेनेने दिला.