‘लॅन्सेट’मध्ये अलीकडेच प्रकाशित अहवालाचा निष्कर्ष
भारतासह जगातील बहुतांश देशातील आदिवासी हे त्या त्या देशातील गैरआदिवासींपेक्षा मागे असल्याचा निष्कर्ष ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झाला आहे. २३ देशातील आदिवासींची आकडेवारी एकत्र करून हा अभ्यास करण्यात आला असून जगाच्या पाठीवरील आदिवासींमध्ये प्रामुख्याने कुपोषण, अर्भक मृत्यूदर अधिक आहे. शैक्षणिक पातळी व उत्पन्न आदिवासींमध्ये कमी आहे.
जगातील १५ कोटी आदिवासींच्या आरोग्याचा व्यापक अभ्यास ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित करण्यात आला. भारतासह जगातील बहुतेक देशांमध्ये आरोग्याच्या विविध निकषांवर आदिवासी हे त्या त्या देशातील गैरआदिवासींपेक्षा बरेच मागे आहेत. २०३० पर्यंत जगातील गरिबी आणि असमानता मिटविण्याच्या संयुक्त राष्ट्र संघांच्या ध्येयाला या अभ्यासामुळे मदत होणार आहे, तसेच विविध धोरणे ठरविण्यास चालना मिळणार आहे. जगातील प्रतिष्ठीत द लॅन्सेट आणि लोवित्जा इन्स्टिटय़ूट, ऑस्ट्रेलिया यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी प्रसिध्द केलेला अहवाल हा जागतिक आरोग्य तज्ज्ञांनी संकलित केलेला आजपर्यंतचा सर्वाधिक व्यापक असा शास्त्रीय अहवाल आहे. २३ देशांमधील आदिवासी जमातींची आकडेवारी एकत्र करून जगातील अध्र्यापेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येचा लेखाजोखा संकलित करून हा महत्वाकांक्षी अहवाल तयार करण्यात आला आहे. आदिवासी परिसरातील आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्या २३ देशातील प्रख्यात तज्ज्ञांना, लेखकांना एकत्र आणणे हे या अभ्यासाचे मोठे यश आहे, असे मत मुख्य लेखक प्रो. ईयान अ‍ॅडरसन यांनी व्यक्त केले. प्रो. अ‍ॅंडरसन हे मेलबर्न विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.
सहभागी देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड, स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, रशिया, चीन, म्यानमार, भारत, थायलंड, पाकिस्तान, ब्राझील, कोलंबिया, चिली, केनिया, पेरू, पनामा, व्हेनेझूएला, कॅमेरून, नायजेरिया यांचा समावेश होता.
या अहवालात भारतातील १० कोटी आदिवासी लोकसंख्येचे आरोग्य आणि विकास निर्देशकांची येथील गैरआदिवासी लोकसंख्येसोबत तुलना करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग हे आदिवासी आरोग्याच्या भारताच्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष, तसेच ‘लॅन्सेट’ने प्रकाशित केलेल्या अहवालाच्या मुख्य लेखकांपैकी एक आहेत. भारतातील पहिले आदिवासी आरोग्य धोरण ही समिती तयार करीत आहे. भारतातर्फे मुंबईच्या आयआयपीएसचे चंद्रशेखर आणि नॅशनल मॉनिटरिंग ब्युरोचे डॉ. लक्षमैय्या यांनी सहकारी म्हणून महत्वाचे योगदान दिले. लोकसंख्या, जन्मवेळेचे आयुर्मान, बालमुत्यू जन्माच्या वेळी कमी आणि जास्त वजन, माता मृत्यू, आहार स्थिती, शैक्षणिक कौशल्य, गरिबी आणि आर्थिक स्थिती या निकषांवर संशोधकांनी अभ्यास केला. ज्यांच्याविषयी विश्वासार्ह आकडेवारी उपलब्ध आहे अशा १९ पैकी १८ आदिवासी जमातीत अर्भक मृत्यूदर, तसेच कुपोषणाचे प्रमाण आदिवासी मुलांमध्ये व स्त्री-पुरुषांचे जास्त आहे. शैक्षणिक पातळी व उत्पन्न आदिवासींमध्ये कमी आहे. राष्ट्रीय सरकारने आदिवासींच्या आरोग्याला लक्ष्य करून काही विशिष्ट धोरण करणे गरजेचे आहे.
आरोग्य सुविधांचा सुयोग्य वापर आणि सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आणि आकडेवारीचा सकारात्मक वापर करणे इत्यादी शिफारशी करण्यात आल्या आहेत.