मनसेला राज्यभर उतरती कळा लागली असताना जळगाव महापालिकेत मनसेला महापौर पदाची लॉटरी लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महापालिकेतील सत्ताधारी खानदेश विकास आघाडीचे नेते महापौर नितीन लढ्ढा यांनी राजीनामा दिल्यानंतर मनसेचे उपमहापौर ललीत कोल्हे यांची महापौरपदी वर्णी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जळगाव महापालिकेतील खानदेश विकास आघाडी सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र स्पष्ट बहुमत नसल्याने त्यांना सत्तेसाठी मनसेचा आधार घ्यावा लागला. जागा वाटपात खानदेश विकास आघाडीकडे महापौर आणि स्थायी समिती  तर मनसेकडे उपमहापौर व महिला बालकल्याण  समितीचा कारभार देण्यात आला.

दोन वर्षांपूर्वी भाजपने मनसे राष्ट्रवादीलासोबत घेवून स्थायी समिती ताब्यात घेत खानदेश विभाग आघाडीला धक्का दिला. महापालिकेच्या इतिहासात सुरेश जैन यांच्या निर्विवाद सत्तेला बसलेला हा पहिलाच धक्का होता. त्यानंतर मात्र वर्षभरानंतर झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत खाविआने मनसे, राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता टिकवून ठेवली. त्यावेळी खाविआचे नेते सुरेश जैन यांनी मनसेला किमान एकवर्ष महापौर पदाचे आश्‍वासन दिले होते. या राजकीय तडजोडीनुसार चार वर्ष महापौर पद सांभाळल्यानंतर शेवटच्या वर्षी मनसेने महापौर पदावर दावा केला होता.

गेल्या आठवडाभरापासून याबाबत चर्चा सुरु असताना नितीन लढ्ढा यांनी बुधवारी रात्री महापौरपदाचा राजीनामा दिला. निवडणूक काळात मनसेला दिलेला शब्द पाळण्यासाठीच सुरेश जैन यांनी लढ्ढा यांना राजीनामा देण्याची सूचना केली होती. गेल्या वर्षी निवडणुकीप्रसंगी उर्वरित काळासाठी महापौरपदाची संधी दिली जाईल, असे आश्वासन सुरेश जैन यांनी दिले होते, असे ललित कोल्हे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केल्याने मनसेलाच महापौर पदाची संधी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.  एकेकाळी विधानसभा निवडणूकीत सुरेश जैन यांच्या विरोधातच शड्डू ठोकणार्‍या कोल्हेंना दिलेली ही संधी म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकीत जैन यांनी एक विरोधक कमी केल्याचे मानण्यात येत आहे.