कोकण रेल्वेमार्गावर वीर-करंजाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे आठ डबे रेल्वे रूळावरून घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कोकणात जाणाऱया अनेक गाडया विविध स्थानकावर अडकल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.
अपघात झाल्यानंतर कोकणकडे निघालेल्या आणि कोकणातून येणाऱ्या सर्वच गाड्या विविध रेल्वेस्थानकांमध्ये अडकून पडल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे. मालगाडीचे घसरलेले डबे हटवून मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास नेमके किती तास लागतील याबाबत रेल्वप्रशासनाकडून निश्चित अशी कोणतीच वेळ देण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाल्याने दिवा-सावंतवाडी पॅसेंजर, सीएसटी करमाळी एसी डबलडेकर एक्सप्रेस पनवेल स्थानकात अडकली आहे. केरळा संपर्कक्रांती एक्सप्रेस अडवली स्थानकात, मंगला एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकात, तर कोईंबतूर-बिकानेर एकसप्रेस कणकवली स्थानकात अडकली आहे. याशिवाय दादर पॅसेंजर भोके स्थानकात आणि नेत्रावती -एर्नाकुलम एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्हयात अडकून पडली आहे.