प. महाराष्ट्रात धरणांची स्थिती समाधानकारक
पश्चिम महाराष्ट्रातील पावसाअभावी तळ गाठलेल्या जलसाठय़ांमध्ये गेल्या तीन आठवडय़ात पाण्याची चांगली वाढ झाली असून, पावसाळय़ाचा उर्वरित कालावधी लक्षात घेता हा पाणीसाठा समाधानकारक मानला जात आहे. अपवाद वगळता जलसाठय़ांची टक्केवारी उत्तम असल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधान तर, खरीप पिकाला उपयुक्त पाऊस झाल्याने बळीराजात चैतन्य दिसून येत आहे.
संपूर्ण जून महिन्यात तळाशी पाणीसाठा राहिलेल्या कोयना जलाशयात चालू जुलै महिन्यात जवळपास ४४ टीएमसी पाण्याची आवक झाली. जुलैच्या प्रारंभीचा कोयनेचा १२ टीएमसीचा पाणीसाठा सध्या ५६ टीएमसी (५३.२० टक्के) आहे. पैकी ५१.७० टीएमसी (४९.१२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. कोयना धरणातील पाण्याची आवक १२,५०० क्युसेक प्रतिसेकंद असून, धरणक्षेत्रात गेल्या ३६ तासात कोयनानगरला ३७ एकूण २,२८३, महाबळेश्वरला २९ एकूण २,३१७ तर, नवजाला ४५ एकूण २९२० मि. मी. पाऊस कोसळला आहे. कोयना धरणक्षेत्रातील पावसाची ही सरासरी २,५०६.६६ (एकूण सरासरीच्या ५०.१३ टक्के) आहे. वारणा धरणाचा पाणीसाठा २५.७५ टीएमसी (७३.४६ टक्के) आहे. राधानगरी धरण भरण्याच्या मार्गावर असून, त्यात ७.५३ टीएमसी ९०.१० टक्के जलसाठा झाला आहे. तर, दूधगंगा धरण निम्मेच भरले असून, त्यात १२.८१ टीएमसी म्हणजेच ५०.४४ टक्के पाणीसाठा असल्याची नोंद आहे. राजापूर येथे कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असून, पाण्याचा विसर्ग २३,५१४ क्युसेक कायम आहे. कृष्णा, कोयना आदी प्रमुख नद्या सर्वसाधारण जलपातळीत वाहत असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये व त्याची कंसात टक्केवारी – कोयना ५६ (५३.२०), वारणा २५.४४ (७८), राधानगरी ७.५३ (९०.१०), दूधगंगा १२.८१ (५०.४४), धोम ६.२१ (४६.०३), कण्हेर ६.०४ (६०), धोम-बलकवडी ३.१९ (७८), उरमोडी ६.७६ (६८), तारळी ३.९३(६६.६१), मोरणा ०.८३ (६३.८४), उत्तरमांड ०.६०(६८), नागेवाडी ०.०९६ (४५.७१), महू ०.२३ (२१.५६), हातेघर ०.०८३(३३.२०), वीर ६.४९ (६८.२५), नीरा-देवघर ६.८० (५८), भाटघर १३.७४ (५८.४८), पवना ४.८१ (५७), गुंजवणी १.८५ (८६), खडकवासला १.६९(८५.५३), पानशेत ६.६४ (६२.३३), वरसगाव ६.७५ (५१.६७), टेमघर १.६६ (४४.६७), मुळशी १२.३३ (६६.७७), माणिकडोह २.९२(२८.६८), येडगाव २.३०(८२.०९), डिंभे ५.३५(४२.८५), वडज ०.७९(६७.६५) तर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात उणे १६.३५(उणे ३०.५२) असा पाणीसाठा आहे.