शुभ्र साखरेचा आग्रह सोडून देऊन ब्राऊन शुगरचा (कच्ची साखर) वापर होण्याकडे ग्राहकांनी लक्ष पुरवावे. पांढऱ्या साखरेच्या तुलनेत ही साखर आरोग्यप्रदही असते, असे प्रतिपादन भारतीय पोलीस दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक व वैकुंठभाई मेहता नॅशनल इन्स्टिटय़ूट को.ऑप. मॅनेजमेंट या संस्थेचे संचालक संजिब पटजोशी यांनी बुधवारी येथे केले.
भारत शुगर यांच्या वतीने येथील राजाराम महाविद्यालयात दोन दिवशीय राष्ट्रीय पदावरील साखर परिषदेचे आयोजन केले आहे. परिषदेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, भारतीय उद्योगाने सक्षम होण्यासाठी केंद्र शासनाच्या पाठीवर प्रयत्न सुरू असताना साखर उद्योगाने काळाचे आव्हान पेलावे. सहकार क्षेत्रातील साखर कारखाने, सूतगिरण्या, बँका आदी उद्योगानेही व्यावसायिक धोरण अवलंबण्याची गरज राहील. साखर कामगारांना व शेतमजुरांना पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विमा योजनांचा लाभ देण्यासाठी साखर उद्योगातील प्रमुखांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कर्नाटकचे माजी उद्योगमंत्री, निरानी शुगर्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुरुगेश निरानी यांना साखर उद्योगाशी संबंधित तर पुणे येथील इंडियाना शेक्रोटेकचे चालक प्रमोदकुमार बेलसरे यांना साखर उत्पादन क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. देशातील साखर उद्योगाशी संबंधित ३८ जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी निरानी म्हणाले, साखर उद्योगातील आव्हाने दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहेत. उसाची एफआरपीची किंमत वाढत असताना साखर दरात घसरण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने साखर उद्योगात धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. बेलसरे म्हणाले, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतानाच साखर उद्योगाने सहवीज निर्मिती, इथेनॉल सारख्या मूल्यवर्धीत उत्पादनाकडे लक्ष देऊन सक्षम होण्याची नितांत गरज आहे. यावेळी भारतीय शुगर्सचे विक्रमसिंग िशदे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे उपाध्यक्ष अमित कोरे, डी. एम. रास्कर, एम. एम. सुंदरम, शशिकांत दळवी यांनी मनोगत व्यक्त केले.