विधान परिषदेत विरोधी पक्षाकडून ज्या मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप करण्यात आले होते, त्या आरोपांना प्रत्युत्तर देत मंत्र्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना क्लीनचीट दिली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विरोधकांनी केलेल्या मागण्यांमुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यावेळी आक्रमक पवित्रा घेतला. भ्रष्ट मंत्र्यांची चौकशी करा, ही मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे पहिल्यांदा कामकाज १५ मिनिटांसाठी तर नंतर २० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. पण नंतरही गोंधळ कायम राहिल्याने विधान परिषदेचे कामकाज सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिवसभरासाठी तहकूब केले.