कॅमेरा ट्रॅपिंगच्या चौथ्या टप्प्याचा अहवाल

भारतीय वन्यजीव संस्थेच्यावतीने नुकत्याच जाहीर केलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगच्या चौथ्या टप्प्याच्या अहवालानुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ३५ छाव्यांची नोंद घेण्यात आलेली आहे. या प्रकल्पात एकूण ८६ वाघांचे वास्तव्य असून त्यात ३५ छावे आहेत. त्यामुळे हा प्रकल्प व्याघ्र अधिवासासाठी अधिक पोषक असल्याचे समोर आले आहे.

भारतीय वन्यजीव संस्थेच्यावतीने दरवर्षी भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपिंगद्वारा वाघांची नोंद घेण्यात येते. यावर्षी अलीकडेच जाहीर झालेल्या अहवालानुसार ताडोबात ८६ वाघांची नोंद घेण्यात आली असून त्यात ३५ छावे आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी अतिशय सुरक्षित प्रकल्प म्हणून गणला गेला आहे. २०१३ पासून या प्रकल्पात वाघांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. कारण येथे वाघांसाठी तृणभक्षी प्राण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून पाणवठे, बांबूचे जंगल यासह पोषक वातावरण आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मेळघाट, पेंच, सहय़ांद्री, नवेगाव-नागझिरा व उमरेड-कऱ्हांडला या पाच व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत ताडोबात छाव्यांची संख्या सर्वाधिक आहे. या छाव्यांचे दर्शन ताडोबात पदोपदी होत आहे. हा प्रकल्प वाघाच्या प्रजननासाठी अनुकूल असल्याचा अभ्यासकांचा निष्कर्ष आहे. या प्रकल्पात बांबूचे जंगल मोठय़ा प्रमाणात आहे. वाघ प्रजननात वाढ करण्याच्या दृष्टीने येथे एखादा विशेष प्रकल्प सुरू करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. देशविदेशातील अभ्यासक बाराही महिने या प्रकल्पात वास्तव्याला असतात. या प्रकल्पाला उत्तम संरक्षण देण्याकरिता वनविभागाने कंबर कसली आहे. पायी किंवा सायकलने गस्त घालून शिकार, चोऱ्या, अवैघ लाकूडतोड, गुरेचराई, बांबूतोड या प्रकारांना कटाक्षाने आळा घातला जातो. मानवाचा या जंगलात सतत वावर राहिल्यास वन्यजीवांच्या स्वातंत्र्यावर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याच्या भीतीमुळे येथे कुणालाही विनापरवानगी प्रवेश दिला जात नाही. वन्यजीव निरीक्षणाकरिता येणाऱ्या पर्यटकांना येथे सकाळी व संध्याकाळी ठरवून दिलेल्या वेळेतच जंगलात फिरून वन्यजीव निरीक्षणाचा मनमुराद आनंद घेता येतो. या वेळी त्यांना एक मार्गदर्शक सोबत घेणे आवश्यक असते. त्याच्या उपस्थितीमुळे पर्यटकांची वनभ्रमंती जास्त फलदायी होते.

दीड महिन्यात दोन छाव्यांचा मृत्यू

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात ३५ छावे असले तरी मागील दीड महिन्यात चंद्रपूर जिल्हय़ात एक ते दीड वर्षांच्या दोन छाव्यांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक छावा सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या तलावाच्या चिखलात फसला होता. दुसऱ्या छाव्याचा चिमूर वनपरिक्षेत्रात मृत्यू झाला. त्यामुळे छाव्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.