देशात सर्वाधिक कपाशीची लागवड करणाऱ्या महाराष्ट्रात कापूस उत्पादकता मात्र हेक्टरी ३७० किलोवरच स्थिरावली असून लगतच्या गुजरातच्या तुलनेत ती निम्म्याहून कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या दशकभरात राज्याची उत्पादकता ही हेक्टरी १९० किलोग्रॅमवरून साडेतीनशेच्या वर गेल्याचे समाधान कृषी विभागाला असले, तरी उत्पादकतेच्या बाबतीत राज्य अजूनही शेवटच्या क्रमांकावर आहे.‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या अंदाजानुसार २०१४-१५ या कापूस हंगामात राज्यात ८३ लाख गाठींचे उत्पादन होईल, गुजरातचे उत्पादन १२६ लाख गाठींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तेलंगणातून ५१ लाख, सीमांध्रमधून २३ लाख तर मध्यप्रदेशातून १९ लाख गाठींचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या हंगामात महाराष्ट्रातून ८४ लाख गाठींचे उत्पादन झाल्याचे सांगण्यात आले आहे. देशात प्रामुख्याने गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये कपाशीची लागवड केली जाते. देशातील एकूण लागवड क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र याच तीन राज्यांमधील आहे. त्यातही सर्वाधिक कपाशीचे लागवडीचे क्षेत्र सातत्याने महाराष्ट्रात आहे, पण उत्पादकतेच्या बाबतीत राज्याचा क्रमांक शेवटचा आहे.
गेल्या वर्षी राज्यात ३८.७२ लाख हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा झाला होता. ८४ लाख गाठींचे उत्पादन झाले. उत्पादकता हाती आली ती हेक्टरी ३६९ किलो. संपूर्ण देशाची सरासरी उत्पादकता ही ५६५ किलो आहे. गुजरातची सर्वाधिक ७५८, मध्यप्रदेशची ५२० तर आंध्रप्रदेशची ५६९ किलोग्रॅम इतकी आली आहे. कापसाचे उत्पादन वाढत असल्याचे सांगून कृषी विभागाकडून स्वत:ची पाठ थोपटून घेतली जात असली, तरी हे उत्पादन लागवडीच्या क्षेत्रातील वाढीमुळे आल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या दशकभरातील आकडेवारी पाहता, गुजरातने कपाशीचे लागवडीखालील क्षेत्र १६ लाख हेक्टरहून २७ लाख हेक्टपर्यंत वाढवले आहे. उत्पादन ५० लाख गाठींहून १२० लाख गाठींवर, तर उत्पादकता ही ५१६ हून ७५८ किलोपर्यंत नेली आहे. त्या तुलनेत महाराष्ट्राची प्रगती अत्यंत संथ आहे. राज्यात २००३-०४ मध्ये २७.६६ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीचा पेरा होता. या क्षेत्रातून
३१ लाख गाठींचे उत्पादन झाले. हेक्टरी उत्पादकता होती केवळ १९० किलो.
अभ्यासकांच्या मतानुसार राज्यातील हेक्टरी उत्पादनात २००७ पासून फारशी वाढच झालेली नाही. या तुनलेत गुजरात आणि आंध्रप्रदेश आघाडीवर होते. गुजरातमधील उत्पादकता ही दहा वषार्ंत दुपटीहून अधिक झाली, महाराष्ट्राला मात्र या कालावधीत ५० टक्क्यांच्या वरही सरकता आलेले नाही. राज्यात सर्वाधिक कापूस पिकवणाऱ्या पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खान्देशात कापूस शेती जवळपास कोरडवाहू स्वरूपाची आहे. पश्चिम विदर्भ सिंचनाच्या बाबतीत सर्वाधिक मागासलेला आहे. कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी आजवर झालेल्या प्रयोगांना फारसे यश मिळू शकले नाही. सिंचन सुविधा वाढवल्याशिवाय कापसाची उत्पादकता वाढू शकणार नाही, असे संशोधकांचे मत आहे.