25 May 2016

मराठी जगत, महाराष्ट्र परिचय केंद्रात जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे

रेखा गणेश दिघे | November 22, 2015 4:10 AM

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्र येथे साजरी करण्यात आली. कोपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, व्यवस्थापक अरुण कालगावकर उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. महाराष्ट्र परिचय केंद्रात जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण केले. दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसकर-कांबळे आणि कमलेश पाटील यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या योगदानाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

व्यापार मेळ्यातील ‘महाराष्ट्र दालनाचे’ शानदार उद्घाटन
येत्या चार वर्षांत महाराष्ट्रात ५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होईल व २० लाख नवे रोजगार उपलब्ध होतील, असा विश्वास राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज व्यक्त केला. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्घाटन आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्रा, महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक शिवाजी दौंड या वेळी उपस्थित होते.

परिचय केंद्राच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
महाराष्ट्र परिचय केंद्राने महाराष्ट्र दालनात शासनाने गेल्या एक वर्षांच्या काळातील विकासकामाची माहिती देणारे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मंत्रिमहोदयांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी मंत्रिमहोदयांनी प्रदर्शनाची पाहणी केली.

महाराष्ट्र दालनात ‘महान्यूज’
यंदाच्या व्यापार मेळ्याची संकल्पना ‘मेक इन इंडिया’ ही आहे. या संकल्पनेवर आधारित ‘मेक इन महाराष्ट्र’ ही यावर्षीच्या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रदर्शनाच्या दर्शनी भागात राज्याच्या विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे एलईडी फलक उभारण्यात आले आहे. यामध्ये ‘महान्यूज’चा फलक दर्शनी भागावर दर्शविण्यात आला आहे. महाराष्ट्रात उद्योग का सुरू करावेत, यासंबंधीची सविस्तर माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. उद्योगांना लागणाऱ्या पायाभूत सुविधा, ई-गव्हर्नस, वस्त्रोद्योग, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान, पर्यटन आदी विषयांची सविस्तर माहिती प्रदर्शनात मांडण्यात आली आहे.

‘कौन बनेगा उद्योगपती’
‘कौन बनेगा उद्योगपती’ हा सेट प्रदर्शनात सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे. कौन बनेगा करोडपतीच्या धर्तीवर हा सेट उभारण्यात आला आहे. हॉट सीटवर आज उद्योगमंत्री सुभाष देसाई व राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील विराजमान झाले व त्यांनी संगणकावरील प्रत्येक पर्यायाची माहिती घेतली. उद्योग विभागाने राबविलेल्या या संकल्पनेचे मंत्रिमहोदयांनी कौतुक केले. या प्रदर्शनात राज्यातील महिला बचत गटाचे स्टॉल्सही मोठय़ा संख्येने आहेत. बॉलीवूडच्या माध्यमातून उद्योगप्रवास दर्शविणारे महाराष्ट्र दालन सर्वाना आकर्षित करीत आहे.

महाराष्ट्र समाज तुलसीनगर-भोपाळ
भोपाळ- महाराष्ट्र समाज, तुलसीगर भोपाळच्या निवडणुका बिनविरोध संपन्न झाल्या. नवीन कार्यकारिणीत सर्वश्री विजय मराठे अध्यक्ष, भरत साठे उपाध्यक्ष, पंकज जोशी सचिव तर रामचंद्र घाणेकर (कोषाध्यक्ष)पदी निवडले गेले.

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या त्रवार्षिक निवडणुका संपन्न
हैद्राबाद- मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या त्रवार्षिक निवडणुकीत विश्वस्त मंडळासाठी अनंतराव कुळकर्णी व मंगला पळनीटकर यांची निवड झाली. तसेच दिगंबर खळदकर अध्यक्ष, नीला तिम्मराजू उपाध्यक्ष, सदीश देशपांडे कार्यवाह, सुमती गोखले कोषाध्यक्ष निवडून आले. कार्यकारिणी सदस्य अ गटासाठी प्रभाकर कोरडे, चंद्रकांत देशमुख, माधव चौसाळकर, मीना देशपांडे, विजयकुमार भोगले व डॉ. कांचन जतकर व ब गटासाठी श्रीकांत आठले, शरद रामचंद्र गावली, पद्मा पालीमकर व विवेक भावे निवडले गेले.

महाराष्ट्र मंडळ कोलकाताचे नवीन पदाधिकारी गण
कोलकाता- महाराष्ट्र मंडळ कोलकाताची दोन वर्षांकरता नवीन कार्यकारिणी निवडून आली. अध्यक्ष- पुष्पा धोटे, उपाध्यक्ष- रवींद्र रेखडे, चिटणीस- नितीन पाटोदकर, स्त्री-चिटणीस- अंजली पाटोदकर, कोषाध्यक्ष- दिवाकर जोशी, जनसंपर्क- पु. न. भिडे, नारायण जोशी सांस्कृतिक विभाग- नंदिता गद्रे व क्रीडा विभाग- ललित ठावरे निर्वाचित झाले.

महाराष्ट्र मंडळ, तेलंगणा
हैद्राबाद- महाराष्ट्र मंडळ (तेलंगणा) हैद्राबादची वर्ष २०१५ ते २०१८ करिता नवीन कार्यकारिणी घोषित झाली. अध्यक्षपदी विवेक देशपांडे, उपाध्यक्ष आनंद कुळकर्णी, अजित देवधर, कार्यवाह गीता काटे, सहकार्यवाह नरहर देव, कोषाध्यक्ष डॉ. प्रसन्न खडकीकर व कार्यकारिणी सभासद सीमा हिप्पळगावकर, सरोज घरीपुरीकार, दीप्ती पळनीटकर, नितीन सावरीकर, दिलीप कुळकर्णी, श्रीमती शुभांगी परळीकर, अंबरीश लहानकर व पराग वढावकर राहतील.

rekhagdighe@gmail.com

First Published on November 22, 2015 12:49 am

Web Title: marathi world 8
टॅग Marathi-world,Stage