महिनाभरापासून गुडूप झालेल्या पावसाने लातूरसह मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना चांगलाच घोर लावला आहे. ज्यांनी पेरणी केली त्या एकाही रोपावर तजेलपणा राहिला नाही. गेल्या आठवडाभरापासून रोपांनी माना टाकणे सुरू केले आहे. पावसाची चिन्हेच नसल्यामुळे जिकडे पाहावे तिकडे अवकळेचेच स्वरूप प्राप्त झाले आहे.
गेल्या तीन वर्षांपासून येणारे प्रत्येक वर्ष मागच्या वर्षीपेक्षा खडतर येत आहे. वरुणराजा दरवर्षी परीक्षेची काठीण्यपातळी गाठत आहे. परिणामी नव्या वर्षांची परीक्षा पास होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही. दरवर्षीच नापास होत असल्यामुळे विश्वासच उडून जावा, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. या वर्षी मृग नक्षत्रातील ८ ते १२ असे ५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. काहींनी धाडसाने पेरणी केली. शेतात पेरणीयोग्य ओल नाही हे माहीत असतानाही साथीचा रोग पसरावा याप्रमाणे शेजारचा पेरतो आहे, म्हणून पेरणी सुरू केली.
जून महिन्यात ८७ मिमी पाऊस झाला. २ जुलच्या पावसाची थोडी भर पडून पावसाने ९५ मिमीची सरासरी गाठली. खरिपातील ५ लाख ५६ हजार क्षेत्रापकी ३ लाख २५ हजार क्षेत्रावर (५८ टक्के) पेरणी झाली. सोयाबीनचे क्षेत्र २ लाख १३ हजार हेक्टर, तर तुरीचे क्षेत्र ५९ हजार ९०० हेक्टर आहे. ज्यांनी पेरणी केली नाही, ते ४२ टक्के शेतकरी दुबार पेरणीच्या संकटातून वाचले. मात्र, पेरणीयोग्य पाऊस नक्की कधी पडेल, ही चिंता त्यांना झोप येऊ देत नाही. ज्यांनी पेरणी केली त्यांनी आठवडाभरापासूनच दुबार पेरणीची तयारी करण्यासाठी पुन्हा एकदा मशागत सुरू केली आहे. पेरणी केलेले ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक क्षेत्र दुबार पेरणीसाठी तयार करण्यात आले आहे.
महिन्यातून केवळ ३ दिवस पिण्याचे पाणी!
लातूर महापालिकेच्या वतीने शहराला कोणत्या भागात, कोणत्या दिवशी पाणी येईल, याचा दिवस जाहीर करण्यात आला असून, महिन्यातून केवळ ३ दिवस पाणी मिळणारे दिवस प्रत्येक भागासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. मुंबईचा कारभार सेकंदावर, पुण्याचा मिनिटावर, पश्चिम महाराष्ट्राचा तासावर तर मराठवाडय़ाचा कारभार दिवसावर चालतो, अशी खोचक टिप्पणी वारंवार केली जाते. त्याची प्रचिती लातूर महापालिकेकडून प्रकाशित पाणी वितरण वेळापत्रकातून आली आहे.