राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला स्वच्छतेचा मंत्र दिला आहे. स्वच्छतेबाबत कमालीचे आग्रही राहणाऱ्या या युगपुरुषाच्या सेवाग्राम आश्रमास मात्र हा मंत्र नवा नाही. विशेष दिनीच नव्हे तर वर्षभर  
सफाईचे काम आश्रमात चालते, अशी नोंद आश्रमास भेट दिल्यावर मिळाली. आम्हाला यात नवे ते काय, असा भाव कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर उमटला.
ज्येष्ठ गांधीवादी पंतप्रधान मोदींच्या आवाहनास स्वागतार्ह ठरवितात, पण शंका उपस्थित करीत सूचनाही करतात. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीराम जाधव म्हणाले, पंतप्रधानांनी देशाला स्वच्छतेची साद घालणे अभिनंदनीय आहे, पण हा छायाचित्रापुरता सोपस्कार ठरू नये. त्यांच्या अनेक योजनांमध्ये गांधीविचार आहे, पण गांधी नावालाच आक्षेप दिसून येतो. गांधीजींना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे त्यांना कळले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सेवाग्राम आश्रमास त्यांनी भेट दिली होती. त्यावेळी आम्ही दिलेल्या चार पुस्तकांपैकी, लोकप्रतिनिधी कसा असावा, या पुस्तकातील विचार ते आता मांडत असल्याचे दिसून येते. २०१८-१९ मध्ये गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नवे उपक्रम हाती घेण्याचे मोंदींना सुचविले होते. त्याची त्यांनी दखल घेतल्याचे दिसून आले. फ क्त त्यांनी सर्वसमावेशकता ठेवावी, अशी अपेक्षा आहे.
सेवाग्राम आश्रमचे संचालक अविनाश काकडे यांनी मोदींच्या उपक्रमावर शंका व्यक्त केली. स्वच्छतेचा गांधी विचार पंतप्रधान अंमलात आणतात. ते स्तुत्य आहे, पण मोदींनी म्हटले आहे की मला काँग्रेसची, किचकट कायद्यांची व गंगेची सफोई करायची आहे. त्यामुळे शंका निर्माण होते. विदेशी राष्ट्रप्रमुखांना संविधान प्रत देण्याऐवजी ते गीता भेटीदाखल देतात. यातून शंका उपस्थित होते. गांधीजींचा सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा विचार ‘अॅक्टर’च्या नवे तर ‘कॅरेक्टर’च्या भूमिकेतूनच भांडणे अभिप्रेत आहे.
गांधीविचार प्रचाराला आयुष्य वाहून घेणाऱ्या डॉ. विभा गुप्ता म्हणाल्या, पंतप्रधानांच्या उपक्रमास देशाने प्रतिसाद द्यावा, पण ही सफोई भौतिक कचऱ्याची अपेक्षित नाही. गांधीजींना केवळ अशी नव्हे जातीवादाची सफोई अपेक्षित होती. खादी हा शब्द जसा ग्राम रोजगाराचे प्रतीक ठरला तर स्वच्छता हा शब्द जाती-धर्मवादाशी निगडित आहे. पंतप्रधानांनी हा हेतूसुध्दा लक्षात ठेवावा, अशी सूचना डॉ. गुप्ता यांनी केली.