सावंतवाडी नगरपालिका विकास आराखडा मराठीतून देण्यात यावा अशी मागणी माझ्यासह नगरसेवकांनी नगररचनाकार यांच्याकडे केली आहे. आराखडय़ाच्या हरकती किंवा माहिती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले. शहरातील रिंगरोड २४ मीटरचा असून कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पाच हेक्टर जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे. नव्याने १४ आरक्षणे सुचविली असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगररचना विभागाने पुढील २० वर्षांच्या विकासाचा आराखडा बनविला आहे. त्याबाबत शहरवासीयांना हरकती घेण्यासाठी ६ ऑक्टोबपर्यंत कालावधी देण्यात आला असल्याचे सांगितले. हा १०० पानी प्रारूप आराखडा इंग्रजीत आहे तो मराठीतून द्यावा आणि हरकतीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली आहे, असे साळगावकर म्हणाले.

शहरवासीयांच्या प्रारूप विकास आराखडय़ाबाबत हरकती नोंदवायच्या असल्यास किंवा माहिती हवी असल्यास त्याबाबत आम्ही सहकार्य करू, असे साळगांवकर म्हणाले. यापूर्वी ५३ आरक्षणे होती ती कायम ठेवून फेरबदल करत नव्याने १४ आरक्षणे केली आहेत, असे साळगांवकर म्हणाले. झिरंगवाडी भागात औद्योगिक झोन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे तिकडे कमर्शिअल बांधकामे होतील. बेळगांव रस्त्याच्या लाडाची बाग या भागात कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी साडेबारा एकर क्षेत्र आरक्षित ठेवले आहे. रिंगरोडजवळच कृषी उत्पन्न बाजार समिती होईल. स्विकेरा अवाटचा पॉलिटेक्निकचा उद्देश बदलून आरक्षण टाकले आहे, असे साळगांवकर म्हणाले. यापूर्वी ११ आरक्षणे संपादित करण्यात आली आहेत. सरकारने आरक्षणे संपादित करण्यास तरतूद केली आहे, असे साळगांवकर म्हणाले. शहरातील रस्ते रुंद होणारे भाग शिवाजी चौक- बेळगाव रोड, शिवाजी चौक-लतीफ बेग, शिरोडा नाका-मिलाग्रीस चर्च, मिलाग्रीस चर्च ते बाजारपेठ, तीनमुशी ते गरड, असे रस्ते रुंदीकरण होतील. शिवाजी चौक ते लतीफ बेग रुंदीकरणात माझ्या भावाचीदेखील जमीन जाईल, असे साळगांवकर म्हणाले. रिंगरोड २४ मीटर तर शिल्पग्राम ते चराठा १२ मीटर रुंद होईल, असे बबन साळगांवकर म्हणाले. सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा लेस्टर गेटजवळ गार्डन उभारणीसाठी आरक्षण टाकले आहे. त्याला आमचा विरोध आहे. राजघराण्याची वैयक्तिक  मिळकत आहे. यासाठी छत्रपतीचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी सावंतवाडीत राजवाडय़ात येऊन राजमाता सत्त्वशीलादेवी भोसले व खेम सावंत भोसले यांच्या समक्ष आरक्षण नको असे निर्देश दिल्याचे साळगांवकर म्हणाले. राजमाता श्रीमंत भोसले यांच्यासमवेत आम्ही असू, असे सांगताना बाहेरचा वाडा भागातदेखील १२ मीटर रस्ता रुंदीकरण होईल. प्रारूप आराखडय़ाच्या आरक्षणाला हरकत घेण्याची मुदत आहे. शहरवासीयांनी अभ्यास करावा असे आवाहन साळगांवकर यांनी केले. मात्र शासन आरक्षणे संपादित करण्यास अनुकूल आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक विलास जाधव, संजय पेडणेकर, गोविंद वाडकर, शर्वरी धारगळकर, साक्षी कुरतडकर, कीर्ती बोंद्रे, शुभांगी सुकी, योगीता मिशाळ, अफरोज राजगुरू, देवेंद्र टेमकर, वैशाली पटेकर, क्षिप्रा सावंत उपस्थित होते.