अपंगांमध्ये असलेल्या क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी जिल्हास्तरावर क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच पाच ठिकाणी राष्ट्रीय क्रीडा केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळा मैदानात रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयांतर्गत असलेल्या अपंग सशक्तीकरण विभागातर्फे आणि श्री पंचायती आखाडा बडा उदासीन निर्माण, जिल्हा प्रशासन आणि कल्याणम् करोति संस्था यांच्या वतीने आयोजित सामाजिक न्याय शिबीर आणि अपंग उपकरण वितरण समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विजयश्री चुंबळे, खा. हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण, महामंडलेश्वर श्री गुरुशरणानंदजी महाराज आदी उपस्थित होते.
इंजिनीअरिंग, वैद्यकशास्त्र, वकिली, प्रशासन आदी सर्व क्षेत्रांत अपंग व्यक्तींनी यश संपादन केले आहे.
पॅराऑलिम्पिकमध्ये ३३ खेळाडूंनी पदक प्राप्त केले आहे. अंधांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपद पटकाविले. अपंगांनी संकल्प केल्यास ते निश्चित चांगले भविष्य घडवू शकतील, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला. अपंगांना शिक्षणासाठी केंद्र सरकारतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते. परदेशात शिक्षणासाठी अल्पदरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.
अपंग व्यक्तींना वितरित केली जाणारी उपकरणे अत्याधुनिक प्रकारची असावीत यावर अधिक भर देण्यात येत आहे. उपकरणांच्या गुणवत्तेकडेही लक्ष देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. पालकमंत्री महाजन यांनी अपंगांना स्वावलंबी बनविता यावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे सांगितले.  प्रास्ताविकात अवस्थी यांनी एका वर्षांत २० लाख अपंगांना विविध उपकरणांचा लाभ देण्यात आल्याची माहिती दिली.