जामीन फेटाळला, न्यायालयीन कोठडीत रवानगी
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना अपहरणानंतर मारहाण केल्याच्या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे शुक्रवारी सकाळी पोलिसांना शरण आले. दुपारी त्यांना चिपळूण येथील प्रथमवर्ग न्यायाधीश प्रथमेश रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आले असताना, त्यांनी राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनासाठी करण्यात आलेला अर्जही त्यांनी फेटाळून लावला. आता राणे यांच्या वतीने खेड येथील जिल्हा सहसत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्या अर्जावर सोमवार किंवा मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
राणे शुक्रवारी चिपळूण पोलीस ठाण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत तीनशे कार्यकर्ते होते. स्वत: कुडाळचे आमदार नितेश राणेही चिपळुणात हजर होते. नीलेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ते कणकवलीला निघून गेले.
तपास अधिकारी बदलला
या प्रकरणाचा धडाडीने तपास करणारे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडून तपासाची सूत्रे काढून ती उपविभागीय पोलीस अधिकारी महादेव गावडे यांच्याकडे सोपविण्यात आल्याने चर्चेला तोंड फुटले आहे.