कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणींचा बाऊ न करता सर्वच गारपीटग्रस्त शेतक-याना वीजबिल माफीचा लाभ मिळावा, अशी मागणी सुगाव खुर्दच्या शेतक-यानी तहसीलदार व वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अकोले तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतक-याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. त्यासाठी शासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांच्या तक्रारीत काही गावे व काही शेतकरी वगळल्याच्या तक्रारी असतानाच गारपीटग्रस्त शेतक-याना शासनाने जाहीर केलेली सहा महिन्यांची वीजबिल माफी देण्यासाठी महावितरण कंपनीने शेतक-याना आणखी एक तांत्रिक विजेचा शॉक दिला आहे.
गारपिटीने नुकसान झालेल्या ज्या शेतक-याच्या नावावर वीज कनेक्शन असेल अशा शेतक-यानाच या वीजबिल माफीचा लाभ मिळणार असल्याचे सांगत गावोगाव वीज कर्मचा-यामार्फत अशाच शेतक-यानी आपली वीजबिले जमा करण्याबाबत सूचना केल्या आहेत. ग्रामपंचायत, विकास सोसायटी यांच्याकडे शेतक-यानी वीजबिले जमा करण्याचे सांगितले. त्याची मुदत दि. २३ एप्रिल असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. ग्रामीण भागात अनेक शेतक-याचे वीज कनेक्शन त्यांच्या आजोबांच्या, वडिलांच्या वा मोठय़ा भावाच्या नावावर असल्याने अशा ठिकाणी वीजबिल माफीची अंमलबजावणी करायची कशी, असा प्रश्न वीज वितरण कंपनीपुढे उभा ठाकला आहे.
महावितरण कंपनीने आपल्या स्तरावर ग्रामीण भागात सर्वेक्षण करून गारपीटग्रस्त शेतक-याची नावे, त्यांचे वीज कनेक्शन कोणाच्या नावावर आहे, याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. नुकसानग्रस्त शेतक-याची नावे महावितरणच्या ग्राहकांच्या यादीशी पडताळून पाहिली जात आहेत. यात बहुतांश नुकसानग्रस्तांच्या नावावर वीज कनेक्शन नसल्याचे आढळून आले आहे. संबंधितांच्या परिवारातील वाडवडील यांच्या नावावर वीज कनेक्शन असून अन्य कोणाच्या नावाने ट्रान्सफर झालेले नाही. असेच सर्वच ठिकाणचे चित्र आहे, त्यामुळे शेतक-याची मोठी अडचण होऊ लागल्याने सुगाव खुर्द येथील शेतक-यानी तहसीलदार व वीज वितरणचे सहायक अभियंता यांना निवेदन देऊन आपले गाऱ्हाणे सोडवण्याची विनंती केली आहे.