गारपिटीत नुकसान होऊनही पंचनामे करताना टक्केवारीकमी दाखवली. झोडपलेला कांदा विक्रीसाठी बाजारात आणला, पण तो काही विकला गेला नाही. घरी नेऊन उकिरडय़ावर फेकून देण्याची वेळ आली. आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दुर्दैवाने पाठ सोडलेली नाही.
कान्हेगाव येथे गारपीट झाली. त्याचे पंचनामे करण्यात आले. नुकसान ५० टक्क्यांपेक्षा कमी दाखवले. पंचनामे झाल्यानंतर पुन्हा दुस-या दिवशी पाऊस झाला. गहू, हरभरा व कांदा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पण त्याची मोजदाद करण्यात आली नाही. आता गव्हाची काढणी झाली. गहू पांढरा झाला आहे. बाजारात तो हमीभावापेक्षा निम्म्या दरात म्हणजे ८०० रुपये िक्वटलने विकला जात आहे. कांदा सडून गेला तर काहींनी तो काढला. पण त्याचा दर्जा खराब झाला. त्यामुळे तो विकला जात नाही. माजी सरपंच रामदास खरात यांनी दीड एकर कांदा शेतातच नांगरून टाकला. मधुकर खरात, रावसाहेब खरात, सोन्याबापू खरात, नारायण खरात, विजय खरात यांचे कांद्याचे तर भाऊसाहेब चौधरी, दिगंबर चौधरी, रावसाहेब खरात, अण्णासाहेब चौधरी यांच्या बटाटय़ाचे तसेच हनुमंत खरात यांच्या डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले.
सदोष पंचनामे झाल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर तहसीलदार किशोर कदम हे पाहणीसाठी आले. परंतु आता आमच्या हातात नाही, असे सांगत त्यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठवतो, असे सांगून शेतकऱ्यांची समजूत काढली. गावकऱ्यांनी कदम यांच्या आश्वासनानंतर मतदानावरील बहिष्कार मागे घेतला होता. पण अद्याप भरपाईसंबंधी किंवा फेरपंचनाम्यासंबंधी कोणताही निर्णय झालेला नाही.
रामदास खरात यांनी बाजार समितीच्या आवारात कांदा विक्रीसाठी आणला. खराब कांदा विकला नाही. उलट हमालीचे पैसे द्यावे लागले. हा कांदा पुन्हा स्वत: गोण्यात भरून घरी नेण्यात आला. तो उकिरडय़ावर फेकून देण्यात आला. त्यांच्याप्रमाणेच चार शेतकऱ्यांना असा अनुभव आला. त्यामुळे गारपिटीतील कांदा आता जमिनीतच नांगरून टाकला जात आहे. शेतकऱ्यांचे १०० टक्के नुकसान होऊनही कृषी खात्याने पंचनामे करताना ३० टक्के नुकसान कसे दाखवले. असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पटारे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आचारसंहिता संपल्यानंतर आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडेही यासंदर्भात तक्रारी करून उपयोग झाला नाही.