देश भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी जनतेने आम्हाला निवडून दिले. आता राज्याला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्याची वेळ आली असून महाराष्ट्रातील जनतेने आता तसा दृढसंकल्प करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मौदा येथे केले. येथील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले.
यावेळी पंतप्रधानांनी राज्य सरकारच्या कार्यशैलीवर घणाघात केला. देशातील जनता भ्रष्टाचाराला कंटाळली असून विकासाच्या मुद्दय़ावर अधिक काळ वाट पाहण्याची जनतेची तयारी नाही, त्यामुळे विकासाच्या मुद्दय़ावर राजकारण करणाऱ्यांचाही लोक तिरस्कार करतात असे स्पष्ट करत मोदींनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणाऱ्या मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला. पंतप्रधानांनी विजेच्या बचतीचे महत्त्वही विशद केले. सरकारने वीज उत्पादनावर भर देण्याचे ठरवले असून देशात ‘रुफ टॉप पॉलिसी’ आणण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोदी म्हणाले. भविष्यात सौरऊर्जेचे महत्त्व वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येक घरावर तयार झालेली वीज त्या कुटुंबाने वापरावी, अशी ही योजना असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले.
‘डिजिटल इंडिया’ या योजनेचे महत्त्वही पंतप्रधानांनी यावेळी पटवून दिले. या योजनेअंतर्गत आता प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये सरकार राहणार आहे. प्रत्येकाला मोबाइलच्या माध्यमातून सरकारविषयक कामात सहभाग नोंदवता येणार आहे. या योजनेत जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहनही मोदी यांनी केले.

मी भ्रष्टाचाराबद्दल बोललो की, काही लोकांच्या पोटात दुखते. ही कुणाची पोटे आहेत, हे जनतेला ठाऊक आहे. कारण, जनतेनेच भ्रष्टाचार संपविण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आता भ्रष्टाचाऱ्यांनाच बदलावे लागेल अशी वेळ आली आहे. भ्रष्टाचारमुक्तीसाठी देशात भाजपला निवडून देणाऱ्या जनतेने आता राज्यातील भ्रष्टाचारमुक्तीसाठी असेच एकत्र यावे.
नरेंद्र मोदी, पंतप्रधान