रायगड जिल्ह्य़ात भातपिकाच्या सर्वेक्षणासाठी कृषी विभागाने एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन कार्यक्रम हाती घेतला आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दर आठवडय़ातून दोन वेळा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.

हवामानातील बदल आणि कीडरोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतीवर विपरीत परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत शेतीची योग्य निगा राखली नाही तर हातातोंडाशी आलेले पीक नाहीसे होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेणे गरजेचे असते.

ही बाब लक्षात घेऊन भातपिकासाठी एकात्मिक कीडरोग व्यवस्थापन आणि सर्वेक्षण कार्यक्रम कृषी विभागाने घेतला आहे.

याअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील ३ हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्र सर्वेक्षणासाठी निवडले जाणार आहे. दर आठवडय़ाला दोन वेळा या पिकाची कृषी विभागाच्या २८ स्काऊट्सच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. ही माहिती मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून अपलोड केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ परिस्थितीच्या अहवालाचा अभ्यास करून कीडरोगाच्या व्यवस्थापनासाठी वेळोवेळी सल्ला देणार आहेत. शेतकऱ्यांनी कुठली फवारणी करावी, कधी करावी, खताचे प्रमाण किती असावे, हवमानाचा परिणाम झाला तर काय उपाययोजना कराव्यात यासारखी माहिती दर आठवडय़ातून दोन वेळा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.

यामुळे कीडरोगाचे योग्य व्यवस्थापन करून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी जिल्ह्य़ात सरासरीच्या ६५ टक्के पाऊस झाला होता. मात्र पिकांची योग्य निगा राखल्याने भाताचे उत्पादन वाढले होते. या वर्षी जिल्ह्य़ात सरासरीच्या ९५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. ही एक समाधानाची बाब आहे. कीडरोगाचे योग्य व्यवस्थापन केले आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केले तर या वर्षीही चांगले भात उत्पादन मिळू शकणार आहे.

सध्या पिकाची वाढ समाधानकारक असून २८ स्काऊट्स आणि ४ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून जिल्ह्य़ातील शेतीवर लक्ष ठेवले जात असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक के. बी. तरकसे यांनी सांगितले.

पेण तालुक्यातील खारेपाट विभागात कीडरोगाचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर कोकण कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी नुकतीच या विभागाची पाहणी केली, या वेळी भातावर कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला नसून खाऱ्या पाण्यामुळे पिकावर परिणाम झाला असल्याचे समोर आले. शेतकऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असल्याचे तरकसे यांनी स्पष्ट केले.