फुले-शाहू-आंबेडकर यांची नावे घेत पुरोगामीत्वाचे ढोल बडवणाऱ्या नेत्यांनी या समाजसुधारकांचे विचार सर्वसामान्यांत पोहोचवण्यासाठी मात्र काहीच प्रयत्न केलेले नाहीत. गेल्या वर्षभरात शासकीय मुद्रणालयाच्या ग्रंथविक्री विभागातून महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहूमहाराज व सावित्रीबाई फुले यांच्यावरील साहित्य, तसेच त्यांची पुस्तके उपलब्ध नाहीत. हे साहित्य वाचणारा मोठा वाचकवर्ग असला, तरीदेखील या पुस्तकांचे पुनर्मुद्रण होत नसल्याने वाचकांची निराशा होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवग्रंथ, त्यांचे लेखन व भाषणे याचे २२ खंड आहेत. काही खंड उपलब्ध आहेत, तर काही उपलब्ध नाहीत. आंबेडकर यांनी प्रकाशित केलेले ‘बहिष्कृत भारत’ व ‘मूकनायक’ हे अंक एकत्रित पाहायला मिळावेत, म्हणून त्याचा ग्रंथ राज्य सरकारने प्रकाशित केला. मात्र, ते गेल्या काही दिवसांपासून वारंवार मागणी करूनही मिळत नाही, अशी तक्रार अनेकांनी केली.
या अनुषंगाने सरकारने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष प्रा. अविनाश डोळस म्हणाले की, समितीचे सदस्य सचिव नव्हते. पुरेसा कर्मचारीवर्ग नव्हता. त्यामुळे काही दिवस पुनर्मुद्रणाचे काम रेंगाळले. वर्षभरापासून अशीच स्थिती आहे. मात्र, आता मुद्रणाचे आदेश दिले आहेत. पाच हजार प्रती लवकरच उपलब्ध होतील. शासकीय ग्रंथागार कार्यालयामार्फत केवळ चार ठिकाणी विक्री होते. मुंबई,  पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांतच ही पुस्तके मिळतात. समितीने शासकीय ग्रंथालयातही ही पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याचे प्रा. डोळस यांनी सांगितले.

विश्वकोशाच्या सीडींबाबतही अनास्थाच
मराठी विश्वकोशाच्या १ ते १७ खंडांच्या सीडी तीन भागांत उपलब्ध आहेत. सवलतीच्या दरात केवळ ७०० रुपयांना हे साहित्य मिळू शकते. गेल्या वर्षभरात प्रचार आणि प्रसार नीट न केल्याने केवळ ६ सीडी विकल्या गेल्याचे सांगण्यात आले. कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा आढावा घेणाऱ्या ‘बोलक्या कन्या’ या ध्वनिफितीही उपलब्ध आहेत. मात्र, त्याही पडून आहेत.  

उपलब्ध नसलेल्या पुस्तकांची नावे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव ग्रंथ ल्ल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषणे
(एकूण २२ खंड)  * शेतकऱ्यांचे आसूड – महात्मा फुले * सावित्रीबाई समग्र वाङ्मय * बहिष्कृत भारत * महाराष्ट्राचे शिल्पकार