पीएम असो की सीएम, जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला सहकार्य करण्याची आमची नेहमीच तयारी आहे. दुष्काळाने ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून लक्ष वेधणार असून, सरकारने या प्रश्नी मार्ग न काढल्यास रस्त्यावर येण्यावाचून आम्हाला पर्याय राहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिला.
मराठवाडय़ाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेला जायकवाडीचा पाणीप्रश्न असो वा पीकरचना, तसेच शेतीचा पाणीप्रश्न किंवा अन्य कोणतेही प्रश्न, या बाबत विचार व्हायला हवाच. प्रश्न हाताळण्याचा आम्हाला अनुभव आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. दुष्काळाने ग्रस्त
वाकोळणी, जामखेड, पारहातगाव या गावांच्या दौऱ्यात पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.  औरंगाबाद, जालना, लातूर, बीड या जिल्ह्य़ांमध्ये  दुष्काळाची तीव्रता आहे. जालन्यात ७० टक्के मोसंबीचे पीक उद्ध्वस्त झाले. आहे ते पीकही वाचविण्याची शेतकरी केविलवाणी धडपड करीत आहे. पाण्याअभावी ज्यांच्या मोसंबीबागा जळाल्या आहेत, त्यांना सरकारने आर्थिक मदत द्यावी. उर्वरित ३० टक्के बागा जगविणाऱ्या शेतकऱ्यांनाही मदतीचा हात द्यावा. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पीककर्जाची थकबाकी माफ करावी, तसेच पीकविमा रक्कमही तातडीने देण्यात यावी आदी मागण्या पवार यांनी केल्या. दूधउत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी आम्ही सामुदायिकरीत्या मुख्यमंत्र्यांना भेटून लक्ष वेधणार आहोत. मात्र, सरकारने या मागण्यांची दखल न घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
टोपे यांच्या समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर पवार यांनी दुष्काळपीडित शेतकऱ्यांशी संवाद साधला. साखर कारखानदारीकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर पुढील वर्षी राज्यातील ५० टक्के कारखाने बंद पडतील, असे पंतप्रधानांच्या निदर्शनास आणले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची नियत ठीक हवी. व्यापार, उद्योग महत्त्वाचे आहेतच. परंतु ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.