तीन गावठी कट्टे आणि २७ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सालिक अहमद अब्दुल अजिज (रा. नयापुरा, मालेगाव) याला पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी पहाटे अटक केली. विक्री करण्याच्या उद्देशाने सालिकने हे कट्टे व काडतुसे जवळ बाळगल्याचा संशय आहे. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालेगाव-दाभाडी रस्त्यावरील एका हॉटेलजवळ एक व्यक्ती गावठी कट्टे घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला व उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने पाळत ठेवून पहाटे एक वाजेच्या सुमारास सालिकला पकडले. त्याच्याजवळील तीन गावठी कट्टे, २७ जिवंत काडतुसे, दोन भ्रमनध्वनी असा सुमारे ८५ हजारांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे कट्टे व काडतुसे त्याने कुठून आणले आणि तो ते कुणाला विक्री करणार होता याचा पोलीस शोध घेत आहेत. सालिक याच्याविरोधात यापूर्वी हत्या, शस्त्रउल्लंघन आदी स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.