१२ नगरसेवक संपर्कात असल्याचा भाजपचा दावा

सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे पडघम आतापासून वाजू लागले असताना ‘आयाराम-गयाराम’चा सिलसिला आतापासूनच सुरू झाला आहे. माकपचे बंडखोर नगरसेवक माशप्पा विटे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता बसपाच्या नगरसेविका सुनीता भोसले यांनी रामदास आठवलेप्रणीत रिपाइंमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान पालकमंत्री विजय देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केल्याने सोलापुरात आगामी काळात हे पक्षांतर आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

नगरसेविका भोसले यांनी रिपाइंचे प्रदेश सरचिटणीस राजा सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसपाच्या ‘हत्ती’कडे पाठ दाखवून रिपाइंत प्रवेश केला. सरवदे यांनी नगरसेविका भोसले यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत करताना पक्षात त्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल, अशी ग्वाही दिली.

पक्ष बदलण्याच्या निर्णयासंदर्भात बोलताना नगरसेविका सुनीता भोसले यांनी बसपामध्ये प्रामाणिकपणे काम करीत असताना त्या पक्षात कधीही सन्मानाची वागणूक मिळत नव्हती. म्हणूनच पक्ष बदलला, असे स्पष्ट केले, तर बसपाचे जिल्हा प्रभारी अ‍ॅड. संजीव सदाफुले यांनी नगरसेविका भोसले यांच्यावर पक्षशिस्तभंग केल्याचा आरोप ठेवला. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत मतदान न करण्याचा निर्णय बसपाने घेतला होता; परंतु हा आदेश धाब्यावर बसवून भोसले यांनी मतदान केले. तेव्हापासून त्यांचा पक्षाशी संबंध तुटला होता, असे अ‍ॅड. सदाफुले यांनी सांगितले.

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी संपर्क वाढविला आहे. पालकमंत्री विजय देशमुख यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीचे बारा नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा यापूर्वीच केला आहे. यामुळे आगामी काळात हे पक्षांतर वाढण्याची चिन्हे आहेत.