चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पदाधिकारी आजपासून अंदमानला रवाना होत आहेत. तीन दिवसांच्या मुक्कामात संयोजकांना वेगवेगळ्या तयारीसंदर्भात सूचना करण्यासाठी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऑफबिट डेस्टिनेशन्स आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे ५ आणि ६ सप्टेंबर रोजी चौथे विश्व साहित्य संमेलन अंदमान येथे होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून सावरकर यांनाच हे संमेलन समर्पित करण्यात आले आहे. सावरकर साहित्याचे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत प्रा. शेषराव मोरे या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आहेत.
अवघा एक महिना उरला असल्याने अंदमान येथील पूर्वतयारीची पाहणी करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य आणि कोशाध्यक्ष सुनील महाजन तीन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत.